मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांवर गुन्हा दाखल
नितीन गांगर्डे
शिवाजीनगर येथील कॉसमॉस बँकेच्या शेजारी रस्त्यावर ठेवलेले मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून १४ हजारांचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. मेट्रो कामावर देखरेख ठेवणारे सुरक्षा रक्षक नितीन नवनाथ कोकणे यांनी या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ईस्क्वेअरच्या बाजूने कॉसमॉस बँकेकडे जाताना तेथे मेट्रोच्या साहित्याची तीन महिला चोरी करत असल्याचे कोकणे यांना आढळून आले. कोकणे मागील तीन महिन्यांपासून पेरीग्रीन सिक्युरीटीतर्फे मेट्रोचे सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहात आहेत. शनिवारी रात्री गस्तीवर असताना पहाटे साडेचार वाजता काही संशयित महिला पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये साहित्य भरत असल्याचे लक्षात आले. या चोरीची खात्री होताच त्यांनी तातडीने टाटा मेट्रो प्रोजेक्टच्या क्यूआरटी पथकाला फोन करून कळवले. पथक घटनास्थळी येताच महिलांकडील गोण्या तपासल्या असता त्यामध्ये लपविलेले लेझर पाईप, स्टील रॉड असे साहित्य आढळून आले. त्यांना क्यूआरटीच्या वाहनामध्ये बसवून महिलांना चतुःशृंगी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता या महिला भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत असल्याचे समजले. सुनीता विनोद दिवेकर (वय ४०, रा. पाटील इस्टेट शिवाजीनगर), अनिता नारायण हजारे (वय ३४, रा. कामगार पुतळा वसाहत) आणि वंदना छगन ससाणे (वय ४५, रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडील एकूण १४ हजार १०० रुपयांचा चोरीचा माल ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार एस. व्ही. केंगले करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.