झगमगाटाचा अट्टाहास, जीवांभोवती मृत्यूचा फास

समृद्धी मार्गावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यशैलीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देताना त्यांनी प्रकशयंत्रणेत केलेले बदल आरटीओकडून नजरेआड केले जात आहेत. त्यामुळे आगीच्या घटना घडण्याची शक्यता व्यक्त करूनही परिवहन विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Mon, 3 Jul 2023
  • 09:06 am
झगमगाटाचा अट्टाहास, जीवांभोवती मृत्यूचा फास

झगमगाटाचा अट्टाहास, जीवांभोवती मृत्यूचा फास

खासगी बसमधील प्रकाशयंत्रणेतील बदलांकडे आरटीओने केला कानाडोळा, वाहतूक संघटनेच्या इशाऱ्याकडे केले दुर्लक्ष

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

समृद्धी मार्गावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यशैलीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देताना त्यांनी प्रकशयंत्रणेत केलेले बदल आरटीओकडून नजरेआड केले जात आहेत. त्यामुळे आगीच्या घटना घडण्याची शक्यता व्यक्त करूनही परिवहन विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय सिमेंट रस्त्यांसाठी कोणते टायर असावे, याबाबतही परिवहन विभाग स्वतःहून काही करताना दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात पुण्यातील सात प्रवाशांचा समावेश आहे. हा अपघात नक्की कशाने झाला हे तपासात समोर येईल. प्रवासी बसला कोणत्या कारणांमुळे आग लागू शकते याची शक्यता पुण्यातील 'थ्रीए रोड सेफ्टी' फाऊंडेशनने २८ मार्च २०२३ रोजी व्यक्त केली होती. प्रवासी बसला आग लागण्याच्या घटनांत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर संघटनेने परिवहन आयुक्तांना पत्र देऊन आक्षेप नोंदवले आहेत. त्यात खासगी बसला केल्या जाणाऱ्या अतिरिक्त प्रकाश योजनेवर बोट ठेवण्यात आले होते.

'थ्री-ए रोड सेफ्टी' फाऊंडेशनचे संचालक विजयकुमार दुग्गल म्हणाले, खासगी बसला आग लागण्याच्या घटनांत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी परिवहन आयुक्तांची भेट घेतली होती. रात्रीच्या वेळी बस पेट घेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे या आगीच्या घटना होत असल्याचे दिसून येत आहे. यातील अनेक बसला अतिरिक्त सहा ते सात हेडलाईट लावल्या जातात. या हेडलाईटला हॅलोजन बल्ब असतात. मोटर व्हेईकल ॲक्टनुसार वाहनांना जास्तीत जास्त सात वॅटचे बल्ब लावले जातात. वाढीव क्षमतेच्या हॅलोजन बल्बला वीज पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त सर्किट जोडले जाते. लांब पल्ल्याच्या बस रात्रीच्या वेळी अधिक प्रवास करतात. अतिरिक्त हॅलोजन बल्बला वीज पुरवठा करण्यासाठी बनवलेल्या सर्किटमध्ये कमी दर्जाच्या वायर असल्यास ओव्हरहिटिंगमुळे जळून आगीच्या घटना घडतात. त्यामुळे प्रवाशांनाही इजा होते. रात्रीचा प्रवास असल्याने प्रवासी झोपलेले असतात. अशात दुर्घटना झाल्यास त्याची तीव्रता वाढते. त्यामुळे अशा बसचे परीक्षण करून त्यावर कडक कारवाई करावी, असे पत्र आम्ही परिवहन आयुक्तांना दिले होते.

टायरवरही लक्ष द्या...

भारतामध्ये सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या उभारणीसाठी सिमेंटचा वापर करण्यात येतो आहे. डांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंट रस्ता अधिक कडक असतो. त्यामुळे टायरचे घर्षण अधिक होते. डांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंट रस्त्यावर टायर अधिक गरम होतो. त्यामुळे टायर अत्यंत चांगल्या दर्जाचा असणे आवश्यक आहे. बाजारात रेडियल आणि नायलॉन असे दोन प्रकारचे टायर मिळतात. रेडियल टायरमध्ये रबरचे प्रमाण नायलॉनच्या तुलनेत अधिक असते. नायलॉन टायरचा वापर जड वाहतुकीसाठी अधिक केला जातो. रेडियल टायरचे आयुष्य जवळपास सव्वालाख किलोमीटर असते. तर, नायलॉन टायर ६० ते ७० हजार किलोमीटरपर्यंत तग धरू शकतो. यामुळे रेडियलची किंमत नायलॉनपेक्षा ८ ते दहा हजार रुपयांनी अधिक असते. आता ट्यूबलेस टायरही उपलब्ध आहेत. ट्यूबलेस टायर पंक्चर झाल्यास ट्यूब टायरप्रमाणे लगेच आघात जाणवत नाही. या गोष्टींचा विचार करून टायर बसवायला हवा. त्याचबरोबर टायरची झीज किती झाली आहे. टायरमध्ये हवेचा दाब किती आहे, हे तपासले पाहिजे. सिमेंट रस्त्यावर पन्नास टक्क्यांहून अधिक झीज झालेला टायर चालवू नये. याकडे दुर्लक्ष झाल्यास अपघाताची शक्यता वाढते. तसेच, चालकाची झोप व्यवस्थित झाली आहे ना, त्याने मद्यप्राशन तर केले नाही ना, अशा सामान्य बाबी प्रवासाला निघण्यापूर्वी तपासणे आवश्यक आहे. चालकाला झोप येत असल्यास त्याने प्रवाशांना सांगून बस थांबवून किमान अर्धातास तरी झोप घेतली पाहिजे. आम्ही तशा सूचना आमच्या ड्रायव्हरला दिल्या आहेत. इतरांनीही त्याचे पालन केले पाहिजे अशी प्रतिक्रिया 'पुणे बस अँड कार ओनर असोसिएशन'चे राजन जुनवणे यांनी व्यक्त केली आहे.

चालकासाठी इन्स्टिट्यूटची गरज...

महामार्गावर प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या चालकासाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवायला हवा. इलेक्ट्रिक वाहनेही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची इत्थंभूत माहिती प्रात्यक्षिकासह मिळण्याची सोय या अभ्यासक्रमात असावी. तसेच, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाहनांची दशा समजण्याची सोय असते. त्याची माहितीही चालकांना या निमित्ताने होईल. आपल्याकडे प्लंबर, इलेक्ट्रिशियनसाठी वेगळा अभ्यासक्रम आहे. मात्र, प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्यांसाठी अभ्यासक्रम नाही. भोसरीमध्ये मध्यवर्ती रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी) आहे. तिथे अगदी जुजबी माहिती दिली जात असल्याचेही जुनवणे यांनी नमूद केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story