आळंदीत पारधी समाजातील १५० जणांना ठेवले डांबून?

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. यामुळे लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पारधी समाजातील तब्बल १२७ ते १५० जणांना वारीनिमित्त आळंदी पोलीस ठाण्यात सकाळपासून डांबून ठेवण्यात आले असल्याचा आरोप अ‍ॅडव्होकेट असिम सरोदे यांनी केला आहे. याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातूनही दिली आहे.

आळंदीत पारधी समाजातील १५० जणांना ठेवले डांबून?

असिम सरोदे यांनी केला आरोप, पोलिसांनी दिले संशयास्पद गोष्टी आढळल्याने ताब्यात घेतल्याचे कारण

देवेंद्र शिरुरकर

devendra.shirurkar@civicmirror.in

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. यामुळे लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पारधी समाजातील तब्बल १२७ ते १५० जणांना वारीनिमित्त आळंदी पोलीस ठाण्यात सकाळपासून डांबून ठेवण्यात आले असल्याचा आरोप अ‍ॅडव्होकेट असिम सरोदे यांनी केला आहे. याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातूनही दिली आहे.

या फेसबूक पोस्टमध्ये सरोदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी अनेक पारधी समाजातील महिला, मुले व पुरुषांना कोणत्या कायद्यानुसार ताब्यात घेतले आहे? इतक्या छोट्याशा जागेत इतक्या जणांना डांबून ठेवल्याने अनेकांचा जीव गुदमरण्याची शक्यता आहे. त्यांना खायला देण्यात आलेले नाही, त्यांना प्यायला पाणी नाही. आळंदी पोलीस ठाणे झोन एकच्या अखत्यारित आहे. येथील सहायक पोलीस आयुक्तांनी अशा प्रकारे कुठल्या तरी कारणावरून पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना कायदा हातात घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत का, हे सांगावे, असे असिम सरोदे म्हणाले आहेत.

कोणत्या शंकेवरून निरीक्षक गोडसे यांनी पारधी समाजातील लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात अटक करून ठेवली आहे, त्यांच्यावर गुन्हा नोंदवला का, अशा पद्धतीने मानवी हक्क उल्लंघन करण्याचा गोडसेंना अधिकार कोणी दिला, असे प्रश्न सरोदे यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान काही गोष्टी शंकास्पद आढळून आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतले आहे. बंदोबस्त असल्याने त्यांना सोमवारी सोडण्यात येणार आहे. तोपर्यंत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणार असल्याचे आळंदी पोलीस ठाण्यातर्फे सांगण्यात आले आहे.

पारधी समाजातील बांधवांना केवळ वारीच्या पार्श्वभूमीवर संशयाच्या जोरावर दिवसभर डांबून ठेवणे अन्यायकारक आहे. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना विनंती आहे की, त्यांनी डांबून ठेवलेल्या पारधी समाज बांधवाना त्वरित सोडावे.

- अ‍ॅड. असिम सरोदे, 

मानवी हक्क कार्यकर्ते

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story