मुलीच्या विवाहसमारंभात पाहुण्यांना वाटली ११०० रोपे
नितीन गांगर्डे
विवाह समारंभात एक वेळ अन्य काही नसले तरी चालते मात्र फटाक्यांची आतषबाजी अन् डीजे असतोच. अलीकडील काळात या दोन गोष्टी विवाह समारंभात अनिवार्य बनल्या आहेत. त्यासाठी लोक वाटेल तो खर्च करत असतात. या पार्श्वभूमीवर डीजे, फटाक्यांवरचा वायफळ खर्च टाळत एका वृक्षमित्राने स्वतःच्या मुलीच्या विवाह समारंभात प्रत्येकाला रुद्राक्षाचे रोप भेट म्हणून दिले आहे. सुमारे ११०० पाहुण्यांना रोपांची भेट देण्यात आली.
चंद्रकांत वारघडे असे या वृक्षमित्राचे नाव आहे. गुरुवारी (४ मे) त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी वारघडे यांनी पाहुण्यांना रुद्राक्षाचे रोप भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. त्यांच्या या विधायक कल्पनेचे कौतुक होत आहे.
फटाके, डॉल्बी सिस्टममुळे हवेचे प्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होते. त्यापेक्षा समाजहिताचा विचार करत त्यांनी या बाबी टाळायचा निर्णय घेतला. लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांना रुद्राक्षाचे रोप देण्याचे ठरवले. त्यासाठी अकराशे रोपे विकत आणली. लग्नाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर ते स्वतः उभे राहून प्रत्येक पाहुण्यांना रोप भेट देत होते. एक रोप त्यांना तीनशे रुपयांना मिळाले. पेरणे फाटा येथे हा अनोखा लग्नसोहळा पार पडला. त्यावेळी आलेल्या सर्वच पाहुण्यांना रोपे पुरली नसल्याने अजून काही रोपे वाटणार असल्याचे वारघडे यांनी सांगितले. पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. आता पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी आपल्याला झाडे लावावीच लागतील, त्यामुळे अशा उपक्रमांची गरज असल्याचे वारघडे म्हणाले. वारघडे यांच्याकडून भेट घेऊन गेलेल्यांपैकी अनेकांनी रोपटे लावल्याचे फोटो पाठवले असल्याचेही वारघडे म्हणाले आहेत.
चंद्रकांत वारघडे यांनी २०१७ ला स्वतःच्या वाढदिवसापासून झाडे लावण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते कोणत्याही कार्यक्रमाला गेल्यावर रोपटे भेट देत असतात. आतापर्यंत त्यांनी वाढदिवस, दशक्रियाविधी, विवाह, दत्त जयंती, वटपौर्णिमा अशा अनेक सणांचे, विधीचे औचित्य साधत रोपटे भेट दिली आहेत.
मी आजवर एक लाख झाडांची लागवड केल्याची माहिती वारघडे यांनी 'सीविक मिरर' शी बोलताना दिली आहे. श्रावणात बेलाचे, रुद्राक्षाची रोपे, दत्तजयंतीला उंबर, वटपौर्णिमेला वडाची रोपे मी वाटत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये या झाडांना दैवत समजले जाते त्यामुळे त्यांची काळजीही घेतली जाते. पुढच्या पिढ्यांसाठी आपण झाडे लावली तरच त्यांचे आयुष्य सुखाने जाणार असल्याचेही वारघडे म्हणाले.
दरम्यान वारघडे यांनी बोपोडीमध्ये ३० हजार, पिंपळे जगताप येथे ४० हजार झाडे लावली आहेत. त्यांच्या गावामधील डोंगरावर हजारो झाडे लावली आहेत. यातील सगळी झाडे जगतील याचीही काळजी घेतली आहे. घराजवळील डोंगरावर झाडे लावल्यानंतर ती जगवण्यासाठी त्यांना हंड्यानी पाणी घातले आहे. गरज पडल्यास टँकर आणून पाणी घातले गेले. आता येथील डोंगरावर पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यातून ठिबकने येथील झाडांना पाणी पुरवठा केला जातो. यामुळे येथे तीन ते चार हजार पक्षी आले आहेत. त्यांच्या खाण्याची आणि पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आयुष्यभरात एक कोटी झाडे लावण्याचा मानस असल्याचे वारघडे यांनी सांगितले. मुलीच्या विवाह समारंभात रोपे वाटत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या चंद्रकांत वारघडे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशाप्रकारे प्रत्येक विवाह सोहळ्यात रोपे वाटप करण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.