मंजू काठीवाडा
#काठमांडू
नेपाळमध्ये १७ वर्षांपूर्वी घडलेल्या विमान दुर्घटनेत वैमानिक दीपक पोखराल यांचा मृत्यू झाला होता. आता यती एअरलाईन्सचे विमान पोखरा विमानतळानजीक कोसळून घडलेल्या दुर्घटनेत त्यांच्या पत्नी व सहवैमानिक मंजू काठीवाडा यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी योगायोगाची चर्चा सध्या सुरू आहे.
यती एअरलाईन्सच्या कोसळलेल्या विमानाच्या मंजू (वय ४४ ) या सहवैमानिक होत्या. हे विमान रविवारी (ता. १५) कोसळले होते. त्यात विमानातील ६८ प्रवासी आणि चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मंजू यांचे पती दीपक पोखराल यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता. दीपक हे वैमानिक होते. जुमला जिल्ह्यात २००६ मध्ये त्यांच्या विमानाचा अपघात घडला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
दीपक यांच्या मृत्यूनंतर मंजू यांचे पिता त्यांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी भारतात पाठवणार होते. परंतु, त्यांनी यास नकार दिला. त्यांनी अमेरिकेत जाऊन वैमानिक प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सहवैमानिक म्हणून कार्यरत होत्या. कोसळलेल्या विमानाचे वरिष्ठ वैमानिक कमल के. सी. हे होते. मंजू यांच्यामागे एक मुलगी आहे.
आणखी काही उड्डाणे केल्यानंतर त्यांना वैमानिकपदी बढती मिळणार होती. वैमानिक बनण्यासाठी किमान १०० तास उड्डाणाचा अनुभव असावा लागतो. त्यांनी नेपाळमधील सर्व विमानतळांवर यशस्वीपणे विमाने उतरवली होती. त्यांनी आणखी एकदा विमान उतरवले असते तर त्यांना मुख्य वैमानिकाचा परवाना मिळाला असता. परंतु, त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
यती एअरलाईन्सचे '९एन एईक्यू' हे २००६ मध्ये विमान नेपाळगंजहून सुरखेतमार्गे जुमला येथे जात होते. या विमानाचे वैमानिक दीपक पोखराल हे होते. हे विमान कोसळून सहा प्रवासी आणि चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. आता १७ वर्षांनी त्यांच्या पत्नीचा यती एअरलाईन्सचे विमान कोसळून मृत्यू झाला आहे. आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करताना मंजू यांचा मृत्यू झाला, असे मंजू यांचे दुसरे पती संतोष तिमिलसिना म्हणाले. बिराटनगर येथे ते माध्यमांशी बोलत होते. मंजू यांचा जन्म याच शहरात झाला आणि त्या वास्तव्यासही तिथेच होत्या.
विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या ७२ वर
यती एअरलाईन्सचे विमान रविवारी कोसळून सर्व प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या विमानात ६८ प्रवासी आणि ४ कर्मचारी होते. त्यातील ६८ जणांचे मृतदेह हाती लागले असून, ४ लहान मुलांचे मृतदेह अद्याप साडपलेले नाहीत. विमानात नेपाळी नागरिकांसह १५ परदेशी नागरिकांचा समावेश होता. त्यात भारतातील ५, रशिया ४, कोरिया २, आणि ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, अर्जेंटिना आणि फ्रान्समधील प्रत्येकी एका प्रवाशाचा समावेश होता.
आयएएनएस