रशियन बाजारपेठेत आता सोलापुरची केळी

आखाती देशाबरोबर आता सोलापुरातील केळीरशियात जाऊन पोहोचली असून याच केळीला युरोपातून ही मागणी होऊ लागली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व मॅग्नेट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी नवी मुंबई जवळील जेएनपीटी बंदरातून रशियाकडे केळीचा कंटेनर रवाना झाला आहे.

संग्रहित छायाचित्र

आखाती देशाबरोबर आता सोलापुरातील केळीरशियात जाऊन पोहोचली असून याच केळीला युरोपातून ही मागणी होऊ लागली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व मॅग्नेट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी नवी मुंबई जवळील जेएनपीटी बंदरातून रशियाकडे केळीचा कंटेनर रवाना झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात केळी पिकासाठी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले कोरडे हवामान, अनुकूल नैसर्गिक स्थिती, जमिनीची प्रतवारी यामुळे येथे वर्षभर केळी लागवड होत असल्याने केळी निर्यातदारांसाठी जिल्ह्यात वर्षभर केळी उपलब्ध होत आहेत.  सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात अकरा लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होतात.

त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेसह देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित ६० टक्के केळी आखाती देशात निर्यात केली जाते. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व माढा हे दोन तालुके केळीचे हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. अनुकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे सर्वात जास्त केळी निर्यात करणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख झाली आहे. येथील केळीला गोडवा असल्याने दिवसेंदिवस आखाती देशामध्ये केळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भविष्यात कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी संधी या पिकासाठी उपलब्ध आहे.

निर्यातक्षम केळीतून ५ हजार कोटींची उलाढाल निर्यातक्षम केळी उत्पादनामुळे या पिकाच्या माध्यमातून पाच हजार कोटींची उलाढाल होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातून १६ हजार कंटेनर केळीची निर्यात होऊन २ हजार २०० कोटींचे परकीय चलन या व्यवसायातून देशासाठी उपलब्ध झाले आहे. यावर्षी देशासाठी ३४ हजार कंटेनर निर्यातीचे उद्दिष्ट समोर असून यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा निम्मा वाटा राहणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मोठी मागणी आहे ही बाब ओळखून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व मॅग्नेट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने रशियामध्ये केळीचा कंटेनर रवाना करण्यात आला आहे. रशियामध्ये निर्यात झालेल्या केळीला प्रति किलोला तब्बल १०५ रुपयांचा भाव मिळणार आहे. रशिया पाठोपाठ येथील केळीस युरोपातूनसुद्धा मागणी होऊ लागलेली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest