संग्रहित छायाचित्र
ओटावा : खालिस्तानावादी दहशतवादी पन्नूने भारतीय प्रवासी विमान सेवा करणाऱ्या कंपन्यांना दिलेल्या बॉम्ब हल्ल्याच्या पाश्वभूमीवर कॅनडातून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीत वाढ केली आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे. सुरक्षा विषयक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी भारतात येणाऱ्या प्रवाशांना तब्बल चार तास अगोदर विमानतळावर बोलावण्यात येत आहे.
भारत आणि कॅनडामधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रूडो सरकारने भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीत वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर कडक सुरक्षा तपासणीतून जावे लागत आहे. कॅनेडियन न्यूज एजन्सी सीबीसीनुसार, अधिकाऱ्यांनी सुरक्षा तपासणी वाढवण्याचे कारण दिलेले नाही.
कॅनडाच्या परिवहन मंत्री अनिता आनंद यांनी एक निवेदन जारी केले आहे की अधिक खबरदारी घेण्यासाठी त्यांच्या सरकारने प्रवाशांच्या सुरक्षा तपासणीत वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना चाचणीसाठी विलंबाला सामोरे जावे लागू शकते.
गेल्या महिन्यात खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नूने १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियामध्ये प्रवास न करण्याचा इशारा दिला होता. दहशतवादी पन्नूने हा व्हिडिओ जारी केला होता आणि सन १९८४ च्या शीख दंगलीचा बदला घेण्याबद्दल तो बोलला होता. त्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे.
कॅनेडियन एअर ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी अथॉरिटी (सीएटीएसए) कडे विमानतळावरील सुरक्षा तपासणी वाढविण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये एक्स-रे मशिनद्वारे बॅग तपासणे आणि प्रवाशांची शारीरिक तपासणी करणे यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रतीक्षा कालावधी वाढला आहे. सीएटीएसएने भारतात येणाऱ्या प्रवाशांना सूचना पाठवून उड्डाणाच्या किमान चार तास आधी विमानतळावर पोहोचण्यास सांगितले आहे.
गेल्या वर्षी एनआयएने पन्नूविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमा अंतर्गत आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.