पुतिन अण्वस्त्र हल्ल्याची धमकी खरी करणार का ?

युक्रेनने मंगळवार (दि.१९) रोजी सकाळी ब्रायन्स्क परिसरात सहा लांब पल्ल्याची आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम (एटीएसीएमएस) या क्षेपणास्त्रे प्रणालीचा उपयोग करीत रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 21 Nov 2024
  • 04:05 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

रशियामध्ये युक्रेनचे हल्ले; अमेरिकन आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम (एटीएसीएमएस) प्रणालीचा उपयोग

मॉस्को : युक्रेनने मंगळवार (दि.१९) रोजी सकाळी ब्रायन्स्क परिसरात सहा लांब पल्ल्याची आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम (एटीएसीएमएस) या क्षेपणास्त्रे प्रणालीचा उपयोग करीत रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. यावर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेला धमकी दिली होती की, अमेरिकेने लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांच्या वापरास मान्यता दिली तर अण्वस्त्र युद्ध सुरू होईल. युक्रेनने प्रथमच अमेरिकेकडून मिळालेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणालीचा उपयोग करीत रशियावर हल्ला केला.

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियाने ५ क्षेपणास्त्रे पाडली. युक्रेनियन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनीही रशियावर एटीएसीएमएसचा वापर केल्याची पुष्टी केली आहे. अमेरिका आणि युक्रेन सरकारने याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.युक्रेनला एटीएसीएमएस क्षेपणास्त्रांना परवानगी मिळाल्यानंतर अवघ्या २ दिवसांनी, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अण्वस्त्रांच्या वापरास परवानगी देणारा निर्णय मंजूर केला आहे. मंगळवारी युक्रेन युद्धाला १००० दिवस पूर्ण झाले.

एटीएसीएमएस ही एक सुपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ते ३०० किमीपर्यंत अचूक हल्ला करू शकते. खरे तर दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युक्रेनला रशियाच्या आत लांब पल्ल्याची आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टीम क्षेपणास्त्रे (एटीएसीएमएस) वापरण्यास मान्यता दिली होती. 

नाटो युद्धात, अमेरिकन उपग्रहांचा उपयोग
काही काळापासून अमेरिका आणि ब्रिटन युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्याचा विचार करत होते. यावर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास परवानगी दिल्याचा अर्थ नाटो रशियाविरुद्धच्या युद्धात उतरला आहे, असा इशारा दिला होता. असे झाले तर नक्कीच उत्तर देऊ असे ते म्हणाले होते.

अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यास बरेच काही बदलेल, असे पुतिन यांनी एका सरकारी टीव्ही चॅनलवर सांगितले होते. या शस्त्रांचा वापर उपग्रहाशिवाय शक्य नाही. युक्रेनमध्ये असे तंत्रज्ञान नाही. हे केवळ युरोपियन युनियन उपग्रह किंवा अमेरिकन उपग्रहाच्या मदतीने केले जाऊ शकते. या क्षेपणास्त्र प्रणालींचा वापर करण्याचे प्रशिक्षण केवळ नाटोच्या लष्करी जवानांनाच मिळाले आहे, असेही पुतिन म्हणाले होते. युक्रेनचे सैनिक ही क्षेपणास्त्रे चालवू शकत नाहीत. याआधी फ्रान्सनेही युक्रेनला लांब पल्ल्याची स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे दिली होती. ती २५० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते. पण त्याचा वापर त्याच्या मर्यादेतच व्हायला हवा, अशीही अट होती.

अमेरिकेने ऑक्टोबर सन २०२३ मध्येच युक्रेनला एटीएसीएमएस क्षेपणास्त्रे दिली होती, परंतु अटींनुसार ते त्यांचा वापर आपल्याच भूमीतील शत्रूंविरुद्ध करू शकतात. रशिया-युक्रेन युद्ध अधिक धोकादायक बनण्याची शक्यता असल्याने अमेरिकेने यापूर्वी रशियावर त्याचा वापर करू नये असे सांगितले होते. 

मात्र आता ते निर्बंध हटवण्यात आले आहेत. या कायदेशीर अनुमतीनुसार ज्या देशाकडे अण्वस्त्रे नाहीत अशा देशाने अणुशक्ती असलेल्या देशाच्या पाठिंब्याने रशियावर हल्ला केला तर तो रशियाविरुद्ध युद्धाची घोषणा मानला जाईल. अशा स्थितीत मॉस्को अण्वस्त्रांचा वापर करू शकतो

बायडेन यांच्या निर्णयामुळे रशियाला नवीन आण्विक सिद्धांत बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा अर्थ असा की आपल्या देशावर नाटोने सोडलेली क्षेपणास्त्रे रशियावर हल्ला मानली जातील. रशिया, युक्रेन किंवा कोणत्याही नाटो देशांवर अण्वस्त्रांनी हल्ला करू शकतो.नाटोने युद्धात प्रवेश केल्याने परवानगी ग्राह्य धरली जाईल, असे रशियाच्या अध्यक्षांनी सांगितले होते.

तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे. अमेरिकेने युक्रेनला रशियामध्ये क्षेपणास्त्र हल्ले करण्यास परवानगी देऊन याची सुरुवात केली. अण्वस्त्र हल्ल्यात अर्धे जग उद्ध्वस्त व्हावे अशी बायडेन यांची इच्छा असावी. रशियाला चिथावणी देण्यासाठी बायडेन प्रशासन जाणीवपूर्वक असे निर्णय घेत आहे. ट्रम्प टीमला याचा सामना करावा लागेल.
- दिमित्री मेदवेदेव, माजी राष्ट्राध्यक्ष

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story