संग्रहित छायाचित्र
इस्लामाबाद : एकीकडे पाकिस्तान आर्थिक संकटात असल्याच्या बातम्या झळकत असतात. पाकिस्तानातील गरिबीचा उल्लेख वारंवार बातम्यात होत असतो. परंतु असे असतानाही तेथील एका भिक्षेकरी कुटुंबाने आपल्या आजीच्या ४० वे श्राद्ध घातले त्यात सव्वा कोटी रुपये खर्च केले आहेत. २० हजार लोक या मेजवानीला हजर होते. या संदर्भातील एक व्हीडीओ सोशल मीडियावरदेखील झळकत आहे. ही दावत चर्चेचा विषय ठरली आहे.
पाकिस्तानच्या गुंजारावाला येथील भिक्षा मागून जगणाऱ्या कुटुंबाने आजीच्या ४० व्या श्राद्धाच्या जेवणाचा कार्यक्रम इतक्या भव्य प्रमाणात साजरा केला की पाहणारेदेखील हैराण झाले आहेत. या दावतीला आम्ही संपूर्ण पाकिस्तानला जेवण घातल्याचा दावा या कुटुंबाने केला आहे. या मेजवानीत मटण बिर्याणी, मुरब्बा, कोल्ड ड्रींक आणि छोटा गोश्त असे पदार्थ वाढल्याचे म्हटले जात आहे. या मेजवानीची सुरुवात पारंपरिक नाश्त्याने झाली.
सायंकाळी मेजवानीत खास चविष्ट खाद्यपदार्थ वाढण्यात आले. यासाठी २५० बकरे कापण्यात आले. यात कोमल मटण, नान मटरगंज सारखा गोड भात होता. गाजर, सफरचंदाच्या अनेक डीश वाढण्यात आल्या. अनेक प्रकारची पेयदेखील वाढण्यात आली. हा भव्य मेजवानी सोहळा गुंजरावाला येथील कॅट परिसरातील रहवाली रेल्वे स्थानकाजवळ आयोजित केलेला होता.
यावेळी हजारोंच्या संख्येत आलेल्या पाहुण्यांना खास शामियान्यात बसवून जेवण वाढण्यात आले. या मेजवानीतील वारेमाप खर्च पाहून यांना भिकारी कुटुंबाची लाईफ स्टाईल चर्चेत आली आहे. या भिकारी कुटुंबाकडे अचानक एवढा पैसा आला कोठून यावर आता चर्चा होत आहेत.