टेरर फंडिंग करणारा 'डल्ला' होणार जेरबंद; खलिस्तानवादी अर्श डल्लाच्या प्रत्यार्पणाची मागणी

भारत-कॅनडा या दोन देशांदरम्यानचे संबंध निज्जर हत्येनंतर भलतेच कडवट जरी झाले आहेत. असे असले तरी भारत सरकारने खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग गिल उर्फ अर्श डल्लाला कॅनडातून परत आणण्याची तयारी सुरू केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 17 Nov 2024
  • 03:53 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भारत-कॅनडा या दोन देशांदरम्यानचे संबंध निज्जर हत्येनंतर भलतेच कडवट जरी झाले आहेत. असे असले तरी भारत सरकारने खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग गिल उर्फ अर्श डल्लाला कॅनडातून परत आणण्याची तयारी सुरू केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एक निवेदन जारी केले की भारतीय एजन्सी कॅनडाकडून डल्लाच्या प्रत्यार्पणाची मागणी करतील. मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला आशा आहे की कॅनडा त्याला भारताकडे सुपूर्द करेल.

डल्ला सध्या कॅनडा पोलिसांच्या ताब्यात आहे. अर्श डल्लाला २८ ऑक्टोबर रोजी कॅनडातील मिल्टन येथे शूटआउट दरम्यान अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपीच्या ओळखीबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. अटक आरोपी अर्श डल्ला असल्याचे नंतर सूत्रांनी सांगितले. हे प्रकरण कॅनडाच्या ओंटारियो न्यायालयात सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. डल्लावर भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो कॅनडामध्येही अशाच प्रकारच्या कृत्यात सहभागी आहे.

भारताने सन २०२३ मध्ये कॅनडाने डल्लाला अटक करण्याची मागणी केली होती. मात्र कॅनडाच्या सरकारने त्यावेळी ही मागणी फेटाळून लावली होती. दरम्यान, जानेवारी सन २०२३ मध्ये भारताने कॅनडाला डल्लाचा संशयास्पद पत्ता, त्याचे भारतातील व्यवहार, त्याची मालमत्ता आणि मोबाइल नंबरची माहिती दिली होती.

भारताने कॅनडाला एमएलएटी करार (परस्पर कायदेशीर साहाय्यता करार) अंतर्गत या माहितीची पडताळणी करण्यास सांगितले होते. डिसेंबर २०२३ मध्ये, कॅनडाच्या न्याय विभागाने या प्रकरणावर भारताकडून अतिरिक्त माहिती मागवली होती. भारताने मार्चमध्ये याला प्रत्युत्तर दिले. अर्श हा खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा जवळचा असून त्याच्यावर भारतात ५० हून अधिक खटले प्रलंबित आहेत. यामध्ये खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी, दहशतवादी कारवाया आणि टेरर फंडिंग यांचा समावेश आहे.

मे २०२२ मध्ये भारत सरकारने अर्श डल्ला विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर २०२३ मध्ये त्याला दहशतवादी घोषित करण्यात आले.

अटक टाळण्यासाठी अर्शने पंजाबमधून कॅनडाला पळ काढला आणि तेथून तो आपल्या कारवाया करू लागला. भारतीय एजन्सी अनेक दिवसांपासून डल्लाला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story