चार दिवस काम, तीन दिवस आराम
#लंडन
आठवड्यातून केवळ चार दिवस काम आणि बाकी तीन दिवस आराम ही कल्पना भारतात राबवण्यात आली तर ? भारतीय कामगार या प्रस्तावाचे स्वागतच करतील. कारण इंग्लंडमध्ये हा फार्म्युला आता लोकप्रिय ठरला आहे. कार्यक्षमता वाढवण्यासाठी इंग्लंडमधील कंपन्यांनी प्रायोगिक स्वरुपात ही कल्पना राबवली आणि आता ९१ टक्के कंपन्यांनी कार्यपद्धतीचे हे प्रारूप कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लडमध्ये मागच्या वर्षी जून ते डिसेंबरदरम्यान कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा हे प्रारूप प्रायोगिक स्वरूपात अंगिकारले होते. त्यांनतर कंपन्यांची सामूहिक कामगिरी, कामगारांची कार्यक्षमता अशा अनेक घटकांची तपासणी करण्यात आली. यात केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड विद्यालयातील अभ्यासकही सहभागी झाले होते. या बदलत्या वेळेमुळे या कामगारांची कार्यक्षमता वाढली आहे, त्यांच्याकडून अधिक विधायक कल्पना समोर येत आहेत. त्यांना बराचसा वेळ आपल्या कुटुंबियांसाठी, आरोग्यासाठी देता येणे शक्य झाले आहे.
या प्रयोगाचे निष्कर्ष सकारात्मक आल्यामुळे इंग्लंडमधील बहुतांश कंपन्या आता त्यांच्याकडे चार दिवसांचा कार्यालयीन कामकाजाचा आठवडा पाळायला तयार झाल्या आहेत. हा फार्म्युला त्यांनी कायमस्वरुपी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. लोक पाच दिवसांच्या आठवड्यात जे काम करत होते, ते कामही चार दिवसांच्या आठवड्यात उत्साहाने करत आहेत. कामगारांचे आरोग्य, मानसिकता सकारात्मक राहणार असेल तरच ते कंपनीसाठी उत्साहाने काम करायला लागतील, अन्यथा ते काम करतील, त्यात आत्मीयता आणि उत्साह नसेल, अशी प्रतिक्रिया 'फोर डे वीक ग्लोबल'ची संकल्पना मांडणारे उद्योगपती डॉ. डेल वेलेहेन यांनी व्यक्त केली आहे. वृत्तसंंस्था