'खासगी आयुष्यात डोकावणे कितपत योग्य?'
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकताच तिच्यासोबत एक खळबळजनक प्रकार घडला. तिच्या लिव्हिंग रुममधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे तिने 'पापाराझी कल्चर'वर संताप व्यक्त केला आहे.
आलिया भट्टने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. त्याबरोबरच संताप व्यक्त करत याबद्दल संबंधित व्यक्तींना जाबही विचारला आहे. दरम्यान, आलिया भट तिच्या लिव्हिंग रूममध्ये बसली असताना हा प्रकार घडला. त्या वेळी तिला समोरच्या इमारतीच्या गच्चीवरून दोन जण कॅमेरा घेऊन तिच्याकडेच बघत असल्याचं तिला दिसलं. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर तिने हे फोटो पोस्ट करून संबंधित प्रसारमाध्यम आणि व्यक्तींना जाब विचारला आहे.
आलियाने तिच्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “तुम्ही मस्करी करत आहात का? मी माझ्या लिव्हिंग रूममध्ये दुपारी निवांत बसले होते आणि तेव्हा मला जाणवलं की, कोणी तरी मला पाहतंय. मी उठून पाहिलं, तर समोरच्या इमारतीच्या गच्चीवरून दोन व्यक्ती कॅमेरा लावून माझ्याकडे पाहत होते. हा प्रकार कोणत्या जगात मान्य आहे आणि हे असं करणं कितपत योग्य आहे?' असा सवाल तिने पोस्टच्या शेवटी केला आहे.
“एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे ही सर्वांत वाईट गोष्ट आहे. प्रत्येकाला एक मर्यादा असते, जी तुम्ही ओलांडू शकत नाही. पण आज मला हे म्हणावं लागतंय की, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहात”, अशी पोस्ट आलियाने केली आहे. आलियाने ही पोस्ट शेअर करताना मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार यावर संताप व्यक्त करीत आहेत. आलियाच्या या पोस्टवर सर्वसामान्यांशिवाय बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया देऊन राग व्यक्त केला आहे.