अक्षयने घेतली सल्लूची मदत
बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार आणि सलमान खान यांचा एक व्हीडीओ समोर आला आहे. यात दोघे आगामी ‘सेल्फी’ चित्रपटातील ‘मैं खिलाडी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दोन्ही सुपरस्टार्सना एकत्र पाहणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे.
प्रथम अक्षय सल्लूला त्याच्या टॅबलेटवर गाणे दाखवताना व्हीडीओत दिसत आहे. गाण्याच्या स्टेप्स पाहिल्यानंतर अक्षय आणि सलमान दोघेही नाचू लागतात. हा व्हीडीओ शेअर करत अक्षयने लिहिले की, ‘सलमान खानला बीट पकडण्यासाठी फक्त काही सेकंद लागले. मग काय भाईने धूम केली!’
व्हीडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे अक्षयकुमारही शाहरुख खानच्या वाटेवर निघाल्याचे काही यूजर्सचे म्हणणे आहे. फ्लॉप चित्रपटानंतर त्यानेही भाईजानचा आधार घेतला आहे.
‘मैं खिलाडी’ हे गाणे १९९४ मध्ये आलेल्या 'मैं खिलाडी तू अनाडी' या चित्रपटातील टायटल साॅंगचे रिमेक आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी आणि नुसरत भरुचा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'सेल्फी' येत्या २४ तारखेला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. याचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. हा चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स' या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात इमरान पोलीस अधिकाऱ्याच्या, तर अक्षय सुपरस्टार विजयच्या भूमिकेत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.