विश्वचषक कप अंतिम सामना पार्टी टाईम
पुणे : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी (World Cup finals )प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. भारतीय संघाची जर्सी खरेदी करण्यापासून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहण्यापासून आणि पार्टीची जय्यत तयारी करून ठेवण्यात आली आहे.
भारतीय संघाने स्पर्धेतील सर्व सामने जिंकले असल्याने क्रिकेट चाहत्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. पुण्यातील अनेक दुकानांमध्ये भारतीय क्रिकेट संघाची जर्सी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. झेंडे, भारतीय क्रिकेट खेळाडूंचे पोस्टरही खरेदी केले जात होते.
कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावरील स्पोर्ट्स दुकानाचे मालक उमेश श्रीकांत यांनी मिररला सांगितले की, सकाळपासून माझ्याकडे भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सी विकल्या जात आहेत. माझ्याकडे एकही जर्सी शिल्लक उरलेली नाही. लोक खूप आनंदी दिसत होते उद्या होणाऱ्या सामन्यासाठी जर्सी, बॅट आणि बॉल खरेदी करण्यासाठी आनंदाने आले होते.
भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील हॉटेल्स सजवली जात आहेत. झेंडे लावले आहेत. रोशनी केली जात आहे. विविध हॉटेलमध्ये खाण्यापिण्यावर विशेष सवलत देऊन अंतिम सामन्याचे थेट स्क्रिनिंग दाखवण्यासाठी भव्य स्क्रीन उभारण्यात येत आहेत. अनेक ग्रुपने एकत्र मॅच पाहण्यासाठी आत्तापासूनच हॉटेलमध्ये रिझर्वेशन करून ठेवले आहे.
शहरातील विविध मॉलमध्ये मॅचचे थेट प्रक्षेपण मोठ्या प्रोजेक्टर स्क्रीनिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मॉल्सने थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी येणाऱ्यांसाठी खास आर्टिस्ट तैनात आहेत. त्यांच्याकडून चेहरे तिरंगी रंगात रंगविले जाणार आहेत. अनेक दुकानांमध्ये खास ऑफर ठेवण्यात आल्या आहे
घरोघरीही पार्ट्यांचे नियोजन केले जात आहे. घरातील महिलांनाही मॅच पाहण्याचा आनंद घेता यावा यासाठी जेवणाची ऑर्डर देण्यात आली आहे. केटरर्स असलेले अमित पवार म्हणाले, वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स, बिर्याणी याची ऑर्डर आहे. अनेकांनी दोन्ही वेळच्या जेवणाची ऑर्डर दिली आहे.
रोनेश निकाळजे यांनी सांगितले की मी उंड्री येथील माझ्या घरी कुटुंबासोबत बार्बेक्यू लंचचा प्लॅन केला आहे. मित्रमंडळींना निमंत्रण दिले आहे.