वॉशिंग्टन सुंदरचे ट्विटर अकाउंट हॅक
#बंगळुरू
भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलं आहे.
सुंदरच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या संदिग्ध माहितीमुळे हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. ५) सकाळी उघडकीस आला. वॉशिंग्टन सुंदरचे अधिकृत अकाउंट हॅक करून क्रिप्टोकरन्सी आणि लिंक सायबर भामट्यांनी पोस्ट केल्या.
हॅक झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या अकाउंटवरून आतापर्यंत तीन पोस्ट करण्यात आल्या होत्या. आता, ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची पुष्टी झाल्यानंतर पोस्ट ब्लॉक करण्यात आल्या आहेत. क्रिकेटशी संबंधित ट्विटर अकाउंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे ट्विटर अकाउंट हँडल २०२१ मध्ये एकदा आणि या वर्षी जानेवारीमध्ये असे दोनदा हॅक झाले होते.
टीम इंडियाचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याचे ट्विटर अकाऊंट २०२२ मध्ये सायबर भामट्यांनी हॅक केले होते. त्यावेळी कृणालच्या अकाऊंटवरून बिटकॉइनची माहिती देणारी लिंक अपलोड करण्यात आली होती.
वॉशिंग्टन सुंदर हा नुकत्याच झालेल्या आयपीएल-१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळला. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो या हंगामातील संपूर्ण सामने खेळू शकला नाही. सात सामन्यांमध्ये सुंदरने ८.२६ च्या इकॉनॉमी रेटने फक्त ३ विकेट घेतल्या. त्याला फलंदाजीत १५ च्या सरासरीने केवळ ६० धावा करता आल्या.
वृत्तसंस्था