वॉर्नरला पुनरागमनाची आस; संधी मिळाल्यास ऑस्ट्रेलियाकडून चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी तयार

मेलबर्न: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करूनही ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 10 Jul 2024
  • 04:17 pm
Sport News, David Warner, Australia, Champions Trophy

संग्रहित छायाचित्र

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली आहे निवृत्ती

मेलबर्न: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करूनही ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

वॉर्नरने यंदा जानेवारीमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने मागील वर्षी एकदिवसीय विश्वचषक जिंकला. वॉर्नर या विश्वविजेत्या संघाचा सदस्य होता.विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने एकदिवसीय प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्घेच्या सुपर एट फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला पाणी पाजून त्यांचे आव्हान संपवले. त्यानंतर वॉर्नरने टी-२० प्रकारातूनदेखील निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्यासर्व प्रकारांतून निवृत्त झाल्यानंतर आता मात्र वॉर्नर पुनरागमनाची आस बाळगून आहे.

वॉर्नर अजूनही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याबद्दल बोलला. त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्याने पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वॉर्नरने लिहिले की, मी फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहीन आणि निवड झाल्यास मी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळण्यास तयार आहे.

२०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गरज पडल्यास उपलब्ध असेल, असे सांगितले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सलामीवीर म्हणून वॉर्नरला पर्याय अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे  क्रिकेट ऑस्ट्रेलियानने वॉर्नरला पुनरागमनाची संधी दिल्यास नवल नाही. वॉर्नर तीन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग आहे, यामध्ये २०१५ आणि २०२३चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०२१ चा टी-२० विश्वचषक यांचा समावेश आहे. 

वॉर्नरची कामगिरी
कसोटी क्रिकेट : डेव्हिड वॉर्नरने २०११ मध्ये ब्रिस्बेनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने ११२ कसोटी सामन्यांत ४४.५९च्या प्रभावी सरासरीने ८,७८६ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये २६ शतके आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे.

एकदिवसीय क्रिकेट : एकिदवसीय क्रिकेटमध्येही वॉर्नरने फलंदाज म्हणून आपला दबदबा राखला. त्याने २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होबार्टमधून वनडे कारकिर्दीची सुरुवात केली होती. मागील वर्षी १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारताविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक फायनलच्या रुपात त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. वाॅर्नरने १६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ४५.३० च्या सरासरीने आणि २२ शतके तसेच ३३ अर्धशतकांच्या मदतीने ६,९३२ धावा केल्या.  यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १४२.४७ असा प्रभावी आहे.

टी-२० क्रिकेट : शैलीदार पण आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघाचा आधास्तंभ होता. ११ जानेवारी २००९ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने क्रिकेटच्या लघुत्तम प्रकारात पदार्पण केले. वॉर्नर २०२१ च्या टी-२० विश्वचषकात प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता. वॉर्नर हा टी-२० प्रकारांत ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ११० टी२०  सामन्यांमध्ये ३,२७७ धावा फटकावल्या आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest