उथप्पाने फेटाळले पीएफ फ्रॉडचे आरोप

माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने पीएफ फसवणूक प्रकरणातील आरोप फेटाळले आहेत. ३७ वर्षीय उथप्पाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टद्वारे आपली बाजू मांडली. ‘‘भविष्य निधी अधिकाऱ्यांनी थकबाकी भरण्याची मागणी करणाऱ्या नोटिसा बजावल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

बंगळुरू : माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने पीएफ फसवणूक प्रकरणातील आरोप फेटाळले आहेत. ३७ वर्षीय उथप्पाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टद्वारे आपली बाजू मांडली.  ‘‘भविष्य निधी अधिकाऱ्यांनी थकबाकी भरण्याची मागणी करणाऱ्या नोटिसा बजावल्या आहेत. यावर आमच्या लीगल टीमने उत्तर दिले आहे. अनेक वर्षांपूर्वी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे,’’ असे त्याने सांगितले.

पुलकेशीनगर पोलीस ठाण्यात २१ डिसेंबर रोजी उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. उथप्पाच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ कापण्यात आला होता, मात्र तो खात्यात जमा करण्यात आला नाही, असा आरोप आहे. यावर उथप्पा म्हणाला, "या प्रकरणात, मी स्ट्रॉबेरी लेन्सेरिया प्रायव्हेट लिमिटेड, सेंटॉरस लाइफस्टाइल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बेरी फॅशन हाऊसमधील माझ्या सहभागाबद्दल स्पष्टीकरण देऊ इच्छितो.

मला या कंपन्यांचे संचालक २०१८-१९ मध्ये करण्यात आले कारण मी त्यांची स्थापना केली होती. मात्र कंपनीच्या कामकाजात माझी कोणतीही सक्रिय भूमिका नव्हती. उथाप्पा म्हणाला, "व्यावसायिक क्रिकेटपटू, टीव्ही प्रेझेंटर आणि समालोचक असल्याने या कंपन्या चालवायला माझ्याकडे वेळ नव्हता. संबंधित कंपन्यांनी स्वत:हून माझ्या गैर सहभागाची पुष्टी करणारी कागदपत्रे दिली आहेत."

  या प्रकरणाशी संबंधित कंपन्या मला उधार दिलेले पैसे परत करण्यात अपयशी ठरल्या. अशा परिस्थितीत मला कायदेशीर पावले उचलावी लागली. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहेत. मी अनेक वर्षांपूर्वी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे, असेही उथप्पाने स्पष्ट केले. 

 बंगळुरू प्रादेशिक ईपीएफओ आयुक्त एस. गोपाल रेड्डी यांनी उथप्पाला ४ डिसेंबर रोजी सुमारे २३ लाख रुपये जमा करण्यासाठी वॉरंट जारी केले होते. वॉरंट देण्यासाठी पुलकेशीनगर पोलीस गेले असता रॉबिन घरी आढळून आला नाही. तो आपल्या कुटुंबासह दुबईत असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, २७ डिसेंबरपर्यंत पैसे जमा न केल्यास रॉबिनला अटक केली जाऊ शकते. 

रॉबिन उथप्पा २००७च्या टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग होता. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने रोमांचक अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव करून पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात रॉबिनने आठ धावा केल्या होत्या. या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात बॉल आऊट झाला होता. यामध्ये धोनीने रॉबिनला चेंडू टाकण्याची संधी दिली होती. रॉबिनचा चेंडू स्टंपला लागला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest