South Africa vs Pakistan 2nd Test
South Africa vs Pakistan 2nd Test | केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. यासह आफ्रिकेने कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या डावात आफ्रिकेसमोर 58 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी एकही विकेट न गमावता पूर्ण केले. आफ्रिकेनं दुसऱ्या डावात 7.1 षटकात 61 धावा करत विजय साकारला. पाकिस्तान संघाला दुसऱ्या डावात निश्चितच संघर्ष करावा लागला, परंतु त्यांचा संपूर्ण डाव 421 धावांपर्यंतच मर्यादित राहिला, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठे लक्ष्य देण्यात ते अपयशी ठरले. रायन रिकेल्टन हा सामन्याचा तर मार्को जॅन्सन मालिकेचा मानकरी ठरला.
South Africa win the second Test by 10 wickets after Pakistan's fightback in their second innings.#SAvPAK pic.twitter.com/KDetBq7bT1
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 6, 2025
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 615 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. रायन रिकेल्टनने 259 धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्याशिवाय कर्णधार टेम्बा बावुमा (106 धावा) आणि काइल वेरेन (100) यांनी शतके झळकावली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या 194 धावांत गडगडला. त्यामुळे पाकिस्तान फॉलोऑन वाचवू शकले नाही.
दुसऱ्या डावात त्यांची चांगली सुरुवात झाली. दुसऱ्या डावात शान मसूद आणि बाबर आझम यांच्यात 205 धावांची मोठी भागीदारी झाली. यादरम्यान बाबर आझमने 81 तर शान मसूदने 145 धावांची खेळी केली. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सॅम अय्युबला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीत फलंदाजी करता आली नाही. बाबर आझम आणि शान मसूद यांच्याशिवाय दुसऱ्या डावात पाकचा एकही फलंदाज 50 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. मोहम्मद रिझवानने 41 आणि सलमान आघाने 48 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेने आधीच गाठली WTC फायनल....
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आफ्रिकेने पहिली कसोटी 2 विकेट्सने जिंकली होती. आता आफ्रिकेने पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान पूर्वीपेक्षा अधिक मजबूत केले आहे. या वर्षी जूनमध्ये आफ्रिकेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.