संग्रहित छायाचित्र....
Latest ICC Test Rankings 2025 : भारतीय क्रिकेट संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 3-1 ने निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे कसोटी क्रमवारीत संघाचे मोठे नुकसान झाले आहे. भारत आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दरम्यान, भारतीय संघाने 2021 आणि 2023 मध्ये खेळण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) पर्यंत मजल मारली होती, परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला यावेळी ती कामगिरी कायम राखता आली नाही.
कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे 126 गुण आहेत. त्याचवेळी, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान काबीज केले आहे, ज्यांचे सध्या 112 गुण आहेत. भारत 109 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महत्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने 2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, विजेतेपदाची लढत या वर्षी जूनमध्ये होईल.
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. एकीकडे ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 3-1 असा पराभव आणि नंतर पाकिस्तानविरुद्ध 2-0 असा विजय यामुळे दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर येण्यात यशस्वी ठरली. इंग्लंड सध्या 106 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. क्रमवारीतील गुणांच्या बाबतीत न्यूझीलंड आणि इतर संघ अव्वल-5 पासून खूप दूर आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान कसोटी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे.
भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीपासून दूर ...
2021 मध्ये पहिल्यांदा जेव्हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला गेला, तेव्हा भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला, तेव्हा न्यूझीलंडने 8 विकेट्सने विजय मिळवून ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने दोन वर्षांनंतर 2023 च्या फायनलमध्येही प्रवेश केला होता, पण यावेळी ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता ही पहिलीच वेळ आहे की भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी खेळणार नाही.