संग्रहित छायाचित्र
भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गाबा कसोटीचा निकाल लागताच अश्विनने निवृत्तीची घोषणा केली. गाबा येथे सुरू असलेला सामना पावसामुळे थांबला होता. तेव्हा अश्विनने विराट कोहलीबरोबर बोलताना खूप भावुक होताना दिसला होता. विराटने त्याला मिठी मारत त्याचे सांत्वन केल्याचे दिसले होते. त्याचा व्हीडिओ समोर आला होता. सामना संपताच आश्विनने निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.
सामना संपल्यानंतर अश्विनने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, "आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व फॉरमॅट्समध्ये भारती क्रिकेटपटू म्हणून आजचा माझा शेवटचा दिवस आहे. मला असे वाटते की क्रिकेटपटू म्हणून माझ्यात अजूनही काही शिल्लक आहे. पण ते मी क्लब स्तरावरील क्रिकेटमध्ये दाखवू इच्छितो. या प्रवासाचा मला खूप आनंद झाला. रोहित आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांसोबत मी खूप आठवणी तयार केल्या आहेत. आपण म्हणू शकतो की आम्ही 'ओजी'चा शेवटचा गट आहोत. साहजिकच, आभार मानण्यासारखे खूप लोक आहेत. पण जर मी बीसीसीआय आणि माझ्या सहकारी संघाचे आभार मानले नाही, तर मी माझ्या कर्तव्यात अपयशी ठरेन. या प्रवासाचा भाग असलेल्या सर्व प्रशिक्षकांचे, विशेषतः रोहित, विराट, अजिंक्य, पुजारा यांचे आभार मानतो. ज्यांनी अप्रतिम झेल घेतले आणि गेल्या अनेक वर्षांत माझ्या विकेट्सची संख्या वाढवली."
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना संपताच रविचंद्रन अश्विन निवृत्त होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. सामना अनिर्णित राहण्याची घोषणा होताच. काही वेळाने अश्विन कर्णधार रोहित शर्मासोबत माध्यमांसमोर आला आणि त्याने निवृत्तीची घोषणा केली. अश्विनने जड अंत:करणाने निवृत्ती जाहीर केली. मात्र तरीही तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
अश्विनची कारकीर्द
कसोटी क्रिकेट
सामने : १०६
विकेट्स : ५३७
५ विकेट्स : ३७ वेळा
१० विकेट्स: ८ वेळा
धावा : ३५०३
शतके : ६
अर्धशतके : १४
सर्वोच्च धावसंख्या : १२४
एकदिवसीय क्रिकेट
सामने : ११६
विकेट्स : १५६
टी-२० क्रिकेट
सामने : ६५
विकेट्स : ७२
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.