संग्रहित छायाचित्र
दुबई: आयसीसीनं या आठवड्यातील लेटेस्ट कसोटी क्रमवारी जारी केली आहे. या रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांची घसरण झाली असून ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला मोठा फायदा झाला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीशिवाय दक्षिण आफ्रिका-श्रीलंका, न्यूझीलंड-इंग्लंड आणि वेस्ट इंडिज-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर ही रॅंकिंग जाहीर करण्यात आली आहे.
इंग्लंडच्या हॅरी ब्रुकला कसोटी फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा होऊन तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे. जो रूटला एका स्थानाचं नुकसान होऊन तो दुसऱ्या स्थानावर घसरला. न्यूझीलंडचा केन विल्यमसन तिसऱ्या आणि भारताची यशस्वी जयस्वाल चौथ्या स्थानावर कायम आहेत. हेडने सहा स्थानांची झेप घेत पाचव्या स्थानावर प्रगती केली आहे. श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस आठवरून सातव्या ती दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा दहाव्यावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलची तीन स्थानांची घसरण झाली. तो आता आठव्या स्थानावर गेला आहे. भारताचा रिषभ पंत तीन स्थानांनी घसरुन नवव्या स्थानावर आला. पूर्वी तो सहाव्या क्रमांकावर होता. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला तीन स्थानांचं नुकसान झालं असून तो ११ व्या स्थानावर पोहचला आहे. मार्नस लाबुशेनही तीन स्थानांनी घसरून १३व्या स्थानावर आला.
दिग्गज विराट कोहलीच्या स्थानात तर मोठी घसरण दिसून आली. तो १४ वरून थेट २०व्या क्रमांकावर घसरला. ॲडलेड कसोटीच्या दोन्ही डावांत त्याने निराशाजनक कामगिरी केली होती. बॉर्डर-गावसकर मालिकेत पदार्पण करताना शानदार कामगिरी करणाऱ्या नितीश कुमार रेड्डी सहा स्थानांनी प्रगती करत ६९व्या स्थानावर पोहोचला आहे.
गोलंदाजीत बुमराह टाॅपवरच
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी कसोटी गमावली असली तरी गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला एका स्थानाच्या फायदा होऊन तो चौथ्या स्थानावर पोहचला. रविचंद्रन अश्विन एका स्थानाच्या घसरणीसह पाचव्या स्थानावर आला. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कने तीन स्थानांनी प्रगती करत ११वे स्थान प्राप्त केले. इंग्लंडचा गस ॲटकिन्सनने १७व्या तर दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज यांनी १८व्या क्रमांकावर प्रगती केली आहे.
सर जडेजांचा पहिला नंबर कायम
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर कायम आहे. तर बांगलादेशच्या मेहंदी हसन मिराजनं दोन स्थानांची झेप घेत दुसरं स्थान पटकावलं. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला तीन स्थानांचा फायदा होऊन तो आठव्या स्थानावर आलाय. भारताचाच अनुभवी खेळाडू रविचंद्रन अश्विन तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.