संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. प्रॉव्हिडंट फंडमध्ये फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
उथप्पा याने त्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून २३ लाख रुपये कापले पण त्याने ते पैसे प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा केलेच नाहीत. याच कारणामुळे त्याला अटक करण्यासाठी ४ डिसेंबर रोजी अटक वॉरंट जारी करण्यात आले. मात्र, उथप्पा याला संपूर्ण रक्कम भरण्यासाठी २७ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात वेळेवर पैसे जमा केले नाहीत तर उथप्पा याला तुरुंगात जावे लागू शकते. खरेतर, रॉबिन उथप्पा हा बंगळुरूमध्ये कपड्यांची एक कंपनी चालवतो. सेंच्युरी लाइफस्टाइल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत त्याची संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीला २३ लाख ३६ हजार ६०२ रुपये आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करायचे होते. मात्र त्यांच्या पगारातून पैसे कापूनही कंपनीने ते पैसे जमा केले नाही, त्यामुळे उथप्पा याच्याविरोधात पूर्व बंगळुरूमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. मात्र उथप्पा याने त्याचा जो पत्ता दिला आहे, सध्या तो तिथे रहात नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या उथप्पा हा दुबईमध्ये आहे. पोलिसांनी पीएफ ऑफिसलाही याबाबत माहिती दिली असून आता ही बाब त्यांच्या अखत्यारीत येत नसल्याचे नमूद केले आहे. सध्या उथप्पाविरोधात कोणतीही अधिकृत एफआयआर किंवा तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. त्याला पीएफ ऑफीसमधून केवळ अटक वॉरंटचे आदेश मिळाले होते. यापूर्वी उथप्पा हा बंगळुरूच्या व्हीलर रोडवरील पुलकेशीनगरमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहत होता.
रॉबिन उथप्पाची कारकीर्द
रॉबिन उथप्पाने भारताकडून २००६ मध्ये वनडे तर २००७ साली टी-२० मध्ये पदार्पण केले. २०१५ साली त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने ४६ वनडेमध्ये २५.९४ च्या रेटने ९३४ धावा केल्या. त्यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २४.९० च्या सरासरीने २४९ धावा केल्या. २००७ च्या टी-२० विश्वचषक संघाचाही तो एक भाग होता. आयपीएलमध्ये त्याने एकूण २०५ सामने खेळले आणि २७.५१ च्या सरासरीने आणि १३० च्या स्ट्राईक रेटने ४९५२ धावा केल्या. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचा भाग होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.