टीम इंडियात बदल नाही; सलामीला राहुल आणि यशस्वीची जोडी कायम, कर्णधार रोहित शर्माने दिली हिंट
पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेतील दुसरा सामना अॅडलेडच्या ओव्हल मैदानात आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. पिंक बॉल टेस्ट असल्याने भारताला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. कारण याच मैदानावर भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यामुळे पिंक बॉल कसोटीचा वचपा काढण्याची संधी रोहित सेनेकडे आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना जिंकून १-० ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचा दावा पक्का करायचा आहे. त्यामुळे हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने नेतृत्व केले होते. मात्र आता रोहित परतल्याने संघात उलथापालथ होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच कर्णधार रोहित शर्माने सलामीची जोडी बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत प्लेइंग इलेव्हनबाबत हिंट दिली आहे. रोहित म्हणाला की, केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांच्यातील भागीदारीने कसोटी सामना जिंकला. मला वाटत नाही की यात काही बदल करण्याची गरज आहे. ही जोडी माझ्यासाठी आणि टीमसाठी उत्तम आहे. गोलंदाजीतही फारसा बदल होणार नसल्याचे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे. हर्षित आणि नितीशचा पहिलाच कसोटी सामना होता असे अजिबात वाटले नाही. त्यांची बॉडी लँग्वेज एकदम जबरदस्त होती. जेव्हा तुम्हाला मोठी मालिका जिंकायची असते तेव्हा तुम्हाला अशा खेळाडूंची गरज असते, असे सांगत रोहितने हर्षित आणि नितीशची प्लेइंग इलेव्हनमधील जागा जवळपास पक्की असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा आणि आर अश्विनला आराम मिळेल असे दिसत आहे. कारण पिंक बॉलवर वेगवान गोलंदाजांचा प्रभाव जास्त असतो. त्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज असतील. तसेच फिरकीसाठी वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळेल. त्यामुळे देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांना आराम दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच रोहित शर्मा आणि शुबमन गिल प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.