IPL 2025 : श्रेयस अय्यर बनला पंजाब किंग्ज संघाचा नवा कर्णधार ...

आयपीएल २०२५ च्या हंगामापूर्वी, पंजाब किंग्जने त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. प्रीती झिंटाच्या मालकीच्या या पंजाब संघाने श्रेयस अय्यरकडे कमान सोपवली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 14 Jan 2025
  • 10:19 am

श्रेयस अय्यर

Punjab Kings New Captain Shreyas Iyer : आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरची नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. फ्रँचायझीने रविवारी (दि. १२), रात्री उशिरा श्रेयसची कर्णधारपदी नियुक्ती जाहीर केली. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या मेगा लिलावात पंजाब फ्रँचायझीने श्रेयसवर तब्बल २६.७५ कोटी रुपयांची बोली लावली होती.

३० वर्षीय श्रेयसने गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले होते. त्याने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्वही केले आहे. श्रेयस लवकरच मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यासोबत संघाची धुरा सांभाळणार आहे. २१ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे.

संघाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला याचा मला सन्मान वाटतो. मी पुन्हा प्रशिक्षक पाँटिंगसोबत काम करण्यास उत्सुक आहे. क्षमता आणि चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे उत्तम मिश्रण असलेला संघ मजबूत दिसत आहे. मला आशा आहे की व्यवस्थापनाने दाखवलेल्या विश्वासाची परतफेड आम्ही आमचे पहिले विजेतेपद जिंकून करू शकू, असे श्रेयस म्हणाला.

श्रेयसने ७० आयपीएल सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्याने ३८ सामने जिंकले, तर २९ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दोन सामने टाय झाले असून एक सामना रद्द झाला. श्रेयसची विजयाची टक्केवारी ५४.२८ इतकी आहे.

श्रेयस हा आयपीएलचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. पंजाब ने त्याला मेगा लिलावात २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याहीपेक्षा जास्त रक्कम ऋषभ पंतला लाभली. त्याला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याचबरोबर कोलकाताने व्यंकटेश अय्यरला २३.७५ कोटी रुपयांत आपल्याकडे ठेवले आहे.

मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून  विजेतेपद पटकावले. या लीगमध्ये संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरला. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली संघाने २०१२ आणि २०१४ मध्येही विजेतेपद पटकावले आहे.

Share this story

Latest