Women's U-19 One Day Trophy 2025 | महाराष्ट्राच्या लेकीनं रचला इतिहास! 14 वर्षांच्या इरा जाधवने त्रिशतकासह मोडित काढला सेहवागचा मोठा विक्रम...

मुंबईची १४ वर्षीय इरा जाधव ही १९ र्षांखालील एकदिवसीय सामन्यात त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. ही उजव्या हाताची फलंदाज १९ फेब्रुवारी रोजी १५ वर्षांची होईल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 13 Jan 2025
  • 06:00 pm
Ira Jadhav

Ira Jadhav

१९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला

Women's U-19 One Day Trophy 2025 | मुंबईची १४ वर्षीय इरा जाधव ही १९ र्षांखालील एकदिवसीय सामन्यात त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. ही उजव्या हाताची फलंदाज १९ फेब्रुवारी रोजी १५ वर्षांची होईल. रविवारी (दि. १२) बंगळुरू येथे झालेल्या एकदिवसीय स्पर्धेत मेघालयविरुद्धच्या सामन्यात इराने शानदार फलंदाजी केली. तिनं १५७ चेंडूत नाबाद ३४६ धावांचा पाऊस पाडला. यादरम्यान तिने १६ षटकार आणि ४२  चौकारांचा पाऊस पाडला. यावेळी तिचास्ट्राईक रेट २२० पेक्षा जास्त होता.

 इराच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने ५० षटकांत ३ बाद ५६३ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. इराव्यतिरिक्त कर्णधार हर्ले गालानं ७९ चेंडूत ११६ धावा केल्या. मुंबईच्या फलंदाजांनी या सामन्यात एकूण १७ षटकार आणि ६३ चौकार मारले. मेघालयच्या तीन गोलंदाजांनी १०० पेक्षा जास्त धावा दिल्या.

आतापर्यंत १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त चार भारतीय महिला खेळाडूंनी २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सध्याची भारतीय कर्णधार स्मृती मंधाना (नाबाद २२४), राघवी बिष्ट (नाबाद २१९), जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद २०२) आणि सानिका चालके (२००) द्विशतक झळकावण्यात यशस्वी झाल्या आहेत. अलीकडे झालेल्या महिला प्रीमियर लीग लिलावात इरा अनसोल्ड राहिली होती. तिच्यावर कोणत्याही संघानं बोली लावली नाही. तिची बेस प्राईज १० लाख रुपये होती.

सेहवागचा विक्रम मोडला..

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सर्वात जलद त्रिशतकाचा विक्रम केला आहे. त्याने २००८ मध्ये चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २७८ चेंडू खेळून त्रिशतक केले होते. आतापर्यंत कोणताही फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेहवागचा विक्रम मोडू शकलेला नाही. १९ वर्षांखालील देशांतर्गत सामन्यात एकदिवसीय सामन्यात त्रिशतक झळकावून इराने सेहवागलाही मागे टाकले. फक्त १५७ चेंडूत ३४६ धावांची अतुलनीय खेळी केली, जी सेहवागलाही या वयात खेळता आली नव्हती.

Share this story

Latest