श्रेयस, ईशान यांना दणका;

रणजी स्पर्धेत खेळण्याऐवजी आयपीएलच्या तयारीला प्राधान्य देणे भोवले, बीसीसीआयने केंद्रीय करारातून केली हकालपट्टी

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Thu, 29 Feb 2024
  • 03:28 pm
Shreyas,bumptoIshaan;

श्रेयस, ईशान यांना दणका;

मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल यांना ‘बी’ श्रेणीतून ‘ए’ श्रेणीत बढती

#मुंबई

बीसीसीआयने इशारा देऊनही रणजी क्रिकेट स्पर्धेत न खेळता आयपीएलच्या तयारीला प्राधान देणे श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या स्टार खेळाडूंना चांगलेच भोवले आहे. बीसीसीआयने या खेळाडूंना केंद्रीय करारातून वगळून त्यांना जोरदार दणका दिला.

बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंसाठी बुधवारी (दि. २८) नवी केंद्रीय करार जाहीर केला. बोर्डाच्या केंद्रीय कंत्राटी खेळाडूंच्या यादीत एकूण ३० खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ‘ए प्लस’ श्रेणीत चार खेळाडू आहेत. ‘ए’ श्रेणीत सहा, ‘बी’ श्रेणीमध्ये पाच, ‘सी’ श्रेणीत १५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात श्रेयस आणि ईशान यांना वगळून बीसीसीआयने रणजी स्पर्धा गंभीरपणे न घेणाऱ्या खेळाडूंना निर्णायक इशारा दिला आहे. हे दोघेही रणजीत खेळायचे सोडून २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी तयारी करत होते.

हा करार १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत असेल. यानुसार कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना बोर्डाच्या ‘ए प्लस’ श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे. या सर्वांना प्रत्येकी ७ कोटी रुपये मिळणार आहेत. 

याशिवाय मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि शुबमन गिल यांना ‘ए’ श्रेणीत बढती देण्यात आली आहे. मागील वर्षी हे खेळाडू ‘बी’ श्रेणीत होते. ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांना ‘ए’ श्रेणीतून ‘बी’ श्रेणीत टाकण्यात आले आहे. या वर्षी धावांची टांकसाळ उघडलेल्या यशस्वी जयस्वालला ‘बी’ ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे.

वार्षिक कराराच्या शिफारशींमध्ये श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्या नावाचाही विचार करण्यात आला होता, मात्र त्यांना केंद्रीय करारात स्थान मिळाले नाही, असे बोर्डाने सोशल मीडियावर नमूद केले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रणजी करंडक न खेळणाऱ्या खेळाडूंना काही दिवसांपूर्वी इशारा दिला. रणजी स्पर्धेत न खेळणाऱ्या खेळाडूंना गंभीर परिणाम भोगावे लागतील, हा गर्भित इशारा शाह यांनी खरा करून दाखवला.

या दोन्ही खेळाडूंच्या वृत्तीमुळे बोर्डाचे अधिकारी संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. बोर्डाने वारंवार विनंती करुनही भारतीय संघाचे दोन्ही खेळाडू रणजी ट्रॉफीचे सामने खेळत नाही. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलची तयारी ते करत होते.

निवड समितीने आकाश दीप, विजय कुमार वैशाक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कवेरप्पा यांच्यासोबत वेगवान गोलंदाजीचा करार करण्याची शिफारस केली आहे. या खेळाडूंना केंद्रीय करारात स्थान मिळाले नसले जरी त्यांच्यासाठी वेगळी घोषणा आगामी काळात केली जाऊ शकते.

पुढील कसोटीनंतर सर्फराझ, ध्रुव ‘सी’ श्रेणीत

बीसीसीआयने बुधवारी जाहीर केलेल्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत इंग्लंडविरुद्ध राजकोट येथील कसोटी गाजवणारा सर्फराझ खान तसेच रांची येथे झालेल्या चौथ्या कसोटीतील विजयाचा शिल्पकार ध्रुव जुरेल या नव्या दमाच्या प्रतिभावान फलंदाजांचा समावेश नाही. मात्र, पुढील महिच्या पहिल्याच आठवड्यात ते करारबद्ध खेळाडूंच्या ‘सी’ श्रेणीमध्ये सामिल होतील. ध्रुव जुरेल आणि सरफराज खान, ज्यांनी नुकतेच भारताकडून कसोटी पदार्पण केले आहे. जे खेळाडू भारताकडून किमान तीन कसोटी, ८ एकदिवसीय सामने किंवा १० टी-२० सामने खेळले असतील त्यांचा नियमानुसाार आपोआप ‘सी’ श्रेणीत समावेश होईल.  

बीसीसीआयने म्हटले आहे की, ध्रुव जुरेल आणि सर्फराझ खान, ज्यांनी आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी धर्मशाला कसोटी सामन्यात, म्हणजे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यात भाग घेतला तर त्यांना ‘सी’ श्रेणीत समाविष्ट केले जाईल.

करारबद्ध क्रिकेटपटू आणि त्यांच्या श्रेणी

 ए प्लस श्रेणी : रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह

 ए श्रेणी : रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि शुबमन गिल

 बी श्रेणी : सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल आणि रिषभ पंत

 सी श्रेणी : ऋतुराज गायकवाड, अर्शदीपसिंग, शार्दूल ठाकूर, संजू सॅमसन, केएस भरत, वाॅशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रिंकू सिंग, तिलक वर्मा, रवी बिष्णोई, जितेश शर्मा, मुकेशकुमार, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest