संग्रहित छायाचित्र
इंदूर : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कर्णधार रोहित शर्मासह बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरुवात होणार आहे. त्याच्या संघात सामील होण्याबाबतचा निर्णय एका सामन्यानंतरच घेतला जाईल. म्हणजेच, पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर भारताला मोहम्मद शमीशिवाय खेळावे लागणार, हे जवळजवळ निश्चित आहे.
रोहित पर्थ कसोटीपूर्वी संघात सामील होऊ शकतो. त्याच्यासोबत शमीही ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. वैयक्तिक कारणांमुळे रोहित संघासह ऑस्ट्रेलियाला रवाना झाला नाही. संघातील उर्वरित सदस्य ११ नोव्हेंबरलाच ऑस्ट्रेलियाला पोहोचले.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
३४ वर्षीय शमी मागील वर्षी १९ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळला होता. यानंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही, या वर्षी जानेवारीमध्ये त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून शमी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या पुनर्वसन शिबिरात होता.
बंगालचे प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला म्हणाले, ‘‘एक वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर गोष्टी तितक्याशा सोप्या होत नाहीत, पण शमीच्या फिटनेसची पातळी पाहता त्याने केलेले काम खूप चांगले झाले आहे. त्याने पहिल्या दिवशी १० षटके टाकली, ज्यात त्याची लय चांगली होती. शमीने संपूर्ण सामन्यात ३७ षटके टाकली. हे आपण लक्षात घ्यायला हवे. शमीकडे बघून असे वाटते की तो सामना खेळायला जाऊ शकतो. तो जितकी अधिक गोलंदाजी करेल, तितकीच त्याच्यासाठी चांगली आहे. नेटमध्ये गोलंदाजी करणे आणि सामन्यातील गोलंदाजी यात फरक आहे.’’
रणजी सामन्यात टाकली ३७ षटके
शमी तब्बल वर्षभरानंतर रणजी सामन्यात मैदानात परतला. मध्य प्रदेश विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात त्याचा बंगाल संघात समावेश करण्यात आला आहे. शमीने मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्या डावात १९ षटकांमध्ये ५४ धावा देत चार बळी घेतले होते. दुसऱ्या डावात त्याने १८ षटकांत ७४ धावा देत दोन बळी घेतले. शिवाय दुसऱ्या डावात त्याने ३६ चेंडूंत २ षटकार आणि २ चौकारांसह ३७ धावांची वेगवान खेळीदेखील केली होती.