फिलिप्सने दाखवला पाँच का दम!

न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया १६४ धावांत गारद, विजयासाठी ३६९ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड ३ बाद १११, दोन दिवसांत २५८ धावांची गरज

PhillipsshowedPanchKaDum!

फिलिप्सने दाखवला पाँच का दम!

#वेलिंग्टन

यजमान न्यूझीलंडआणि ऑस्ट्रेलिया या शेजाऱ्यांत सुरु असलेली पहिली कसोटी रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. अष्टपैलू ग्लेन फिलिपने आपल्या फिरकीच्या जोरावर पाच बळी घेत शनिवारी (दि. २) कांगारुंचा दुसरा डाव १६४ धावांवर गुंडाळला. आता विजयासाठी दोन दिवसांत २५८ धावा करण्याचे आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर आहे.

उभय संघांतील दोन कसोटींच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगलीच रंगत बघायला मिळत आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३८३ धावा केल्यानंतर त्यांनी न्यूझीलंडला केवळ १७९ धावांवर बाद केले. पहिल्या डावात २०४ धावांची घेतलेली मोठी आघाडी पाहता ऑस्ट्रेलिया संघाने या सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कांगारुंचा दुसरा डाव १६४ धावांवर गुंडाळून त्यांचे विमान जमिनीवर आणले. ऑफ स्पिनर फिलिप्सने ४५ धावांत ५ बळी घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. विजयासाठी ३६९ धावांच्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दिवसअखेर ३ बाद १११ धावा केल्या होत्या. अष्टपैलू रचिन रवींद्र ५६ तर डेरिल मिचेल १२ धावांवर खेळत होते. सामन्याचे दोन दिवस शिल्लक असून विजयासाठी अडीचशेच्या घरात धावा करण्याचे आव्हान न्यूझीलंड संघासमोर आहे. त्यांच्याकडे सात फलंदाज शिल्लक असल्याने आणि त्यातही संघाचा आधारस्तंभ केन विल्यम्सन पॅव्हेलियनमध्ये परतला असल्याने दोन्ही संघांना विजयाची संधी आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. नाईट वाॅचमन म्हणून दुसऱ्या दिवसअखेर फलंदाजीस आलेल्या नाथन लियाॅनने या संघातर्फे सर्वाधिक ४१ धावा केल्या. पहिल्या डावातील दीडशतकवीर कॅमेरुन ग्रीन (३४) आणि ट्रेव्हिस हेड (२९) यांना खेळपट्टीवर जम बसल्यानंतरही मोठी खेळी करता आली नाही. या दोघांनाही फिलिप्सने बाद केले. मॅट हेन्रीने ३ तर कर्णधार टीम साऊदीने २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.

विजयासाठी ३६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला प्रारंभीच जोरदार हादरे बसले. सलामीवीर टाॅम लॅथमची (८) शिकार ऑफ स्पिनर लियाॅनने केली. वर्तमान क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या केन विल्यम्सनलाही लियाॅननेच स्वस्तात माघारी धाडले. विल्यम्सनने केवळ ९ धावा केल्या. कामचलाऊ ऑफ स्पिनर ट्रॅव्हिस हेडने दुसरा सलामीवीर विल यंग (१५) याला बाद करीत यजमानांची अवस्था ३ बाद ५९ अशी केली. अशा अडचणीच्या वेळी रचिन रवींद्र आणि डेरिल मिचेल ही जोडी जमली. या दोघांनीही अतिशय जबाबदारीने खेळ करीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ५२ धावांची भागिदारी केली. दरम्यान, रचिनने पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले. दिवसअखेर तो ५६ धावांवर खेळत होता. त्याने ९४ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ८ चौकार लगावले. त्याला खंबीर साथ देणारा डेरिल मिचेल ६३ चेंडूंत १२ धावांवर खेळत आहे.  वृत्तसंस्था 

संक्षिप्त धावफलक :

ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : ३८३.

न्यूझीलंड : पहिला डाव : १७९.

ऑस्ट्रेलिया : दुसरा डाव : ५१.१ षटकांत सर्व बाद १६४ (नाथन लियाॅन ४१, कॅमेरुन ग्रीन ३४, ट्रॅव्हिस हेड २९, उस्मान ख्वाजा २८, ग्लेन फिलिप ५/४५, मॅट  हेन्री ३/३६, टीम साऊदी २/४६)

न्यूझीलंड : दुसरा डाव : ४१ षटकांत ३ बाद १११ (विल यंग १५, केन विल्यम्सन ९, रचिन नवींद्र खेळत आहे ५६, डेरिल मिचेल खेळत आहे १२, नाथन लियाॅन २/२७, ट्रॅव्हिस हेड १/१०).

 फिलिप्स गाजवतोय सामना

 या सामन्यात न्यूझीलंडचा अष्टपैलू ग्लेन फिलिप्स चमकदार कामगिरी करीत आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडचे फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या तालावर नाचत असताना फिलिप्सने मात्र आक्रमक फलंदाजी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान  तसेच फिरकी गोलंदाजांवर जोरदार प्रतिहल्ला चढवत ७० चेंडूंत ७१ धावा  फटकावल्या. यात १३ चौकारांचा समावेश होता. न्यूझीलंडच्या डावात सर्वाधिक योगदान २७ वर्षीय फिलिप्सचेच होते. त्याच्या फलंदाजीमुळेच न्यूझीलंडला पावणेदोनशेचा टप्पा गाठता आला.  

त्यानंतर फिलिप्सने दुसऱ्या डावात कांगारुंची दैना उडवत पाच बळी घेतले आणि आपल्या संघासाठी विजयाची संधी निर्माण केली. त्याच्या रुपात न्यूझीलंडच्या फिरकीपटूने घरच्या मैदानावर ६ वर्षांत प्रथमच पाच गडी बाद  करण्याचा पराक्रम नोंदवला.  फिलिप्सने उस्मान ख्वाजा (२८), कॅमेरॉन ग्रीन (३४), ट्रॅव्हिस हेड (२९), मिचेल मार्श (०) आणि ॲलेक्स कॅरी (३) या दादा फलंदाजांना बाद करीत कांगारुंना दणका दिला.  फिलिप्सच्या आधी जितेन पटेलने २००८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या नेपियर कसोटीत ११० धावांत ५ बळी घेतले होते. विशेष म्हणजे, करिअरमध्ये पाच बळी घेण्याची फिलिप्सची ही पहिलीच वेळ आहे. त्याने आतापर्यंत ६ कसोटींत १६ बळी घेतले आहेत. आता सामन्याच्या चौथ्या  डावात न्यूझीलंडचा संघ विजयासाठी धावांचा पाठलाग करत आहे. दुसऱ्या डावाप्रमाणे या डावातही फिलिप्स आपल्या बॅटचा तडाखा कांगारुंना देणार काय, यावर सामन्याचा निकाल बऱ्याच प्रमाणात अवलंबून असेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest