पाक आशिया चषकामधून बाहेर पडण्याची शक्यता
#लाहोर
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार यजमान असलेला पाकिस्तानच बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे.
श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानने हायब्रीड मॉडेलमध्ये स्पर्धा घेण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानकडे आशिया कपमधून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. वास्तविक, यावेळी आशिया कपचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला.
भारताच्या भूमिकेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि इतर काही देशांत ३-४ सामने हायब्रीड पद्धतीने आयोजित करण्याची योजना मांडली. परंतु श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यासाठी तयार नव्हते. मात्र, आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानबाहेर अन्य कोणत्याही आशियाई देशात करण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी क्रिकेट व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. आशिया चषकाचा एकही सामना पाकिस्तानमध्ये खेळला गेला नाही तर पाकिस्तान आशिया कप खेळणार नाही, असे सेठी सांगत आहेत. आता आता ही स्पर्धा श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे. जर पाकिस्तान या स्पर्धेत खेळला नाही, तर आशिया चषक स्पर्धेचे प्रसारक पुन्हा टेलिकास्टच्या अटी आणि किंमती ठरवतील.