लक्ष्य स्पोर्ट्स आणि अमल्गम स्टील तर्फे 'प्रोजेक्ट ग्रँड स्लॅम' ची घोषणा
उत्कृष्ट स्वयंसेवी संघटनेचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या लक्ष्य स्पोर्ट्सने कोलकाता येथील अमल्गम स्टील या उद्योगाशी सहकार्य करार केला असून 'प्रोजेक्ट ग्रँड स्लॅम' या आगळ्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून भारतातील उदयोन्मुख टेनिस खेळाडूंपैकी मुलींच्या गटातून गुणवान खेळाडू शोधून त्यांच्यातून भविष्यात ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये अधिकाधिक खेळाडू चमकण्यासाठी दर्जेदार खेळाडू घडविण्याचे आव्हान दोन्ही संस्थांनी स्वीकारले आहे.
लक्ष्यचे उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव सुंदर अय्यर आणि अमल्गम स्टीलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सौरव मिश्रा यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या प्रकल्पाद्वारे कुमार मुलींच्या गटातील गुणवान टेनिसपटू अगदी तळागाळापासून शोधून काढून त्यांच्यामधून भविष्यात केवळ ग्रँड स्लॅम स्पर्धाच नव्हे, तर जागतिक दर्जाच्या खेळाडू घडविण्याकरिता सर्वतोपरी साहाय्य केले जाणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सुंदर अय्यर म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत आपल्याकडे ज्युनियर ग्रँड स्लॅमपर्यंत मजल मारणारी केवळ एकच खेळाडू आहे. परंतु या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या काही वर्षांत किमान चार-पाच खेळाडू सातत्याने उच्च स्तरावर सहभागी होत असल्याचे पाहणे शक्य होणार असून त्यामुळे भारतीय टेनिसमधील एक नवा अध्याय सुरू होणार आहे. इतकेच नव्हे तर व्यावसायिक टेनिस स्पर्धामध्ये वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश मिळविणेही मुलींना शक्य होणार आहे.
अमल्गम स्टील या उद्योगाच्या सामाजिक दायित्व विभागाच्या क्रीडाक्षेत्राला साहाय्य करणे आणि विविध खेळांमधील क्रीडापटूंचे सबलीकरण करणे या मोहिमेअंतर्गत अमल्गम स्टील आणि लक्ष्य स्पोर्ट्स यांच्यातील करार शक्य झाला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना अमल्गम स्टीलच्या मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक विजय पांडे म्हणाले, की युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि शिस्त, सांधिकवृत्ती आणि लवचिकपणा हे गुण रुजविण्याकरिता क्रीडाक्षेत्रातील सहभागाला अत्यंत महत्त्व असल्याचा आमचा विश्वास आहे. त्यामुळेच आम्ही लक्ष्य स्पोर्ट्सला प्रोजेक्ट ग्रँड स्लॅमसाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. ज्युनियर ग्रँड स्लॅम विजेते घडविणे हेच आमच्या प्रकल्पाचे लक्ष्य असून त्यासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावण्याकरिता साधनसुविधा, तसेच सर्व अत्यावश्यक साहाय्य करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कोवळ्या वयातच गुणवान खेळाडूंना टिपून करीअरमध्ये सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी त्यांना साहाय्य करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदीप्यमान यश मिळविण्याकरिता त्यांना 'प्रोजेक्ट ग्रँड स्लॅम' अंतर्गत सर्वतोपरी साहाय्य करण्यात येणार असून त्यातील विविध घटक असे आहेत : १) शिष्यवृत्ती - प्रशिक्षण आणि विविध स्पर्धामधील सहभागासाठी अर्थसाहाय्य, २) विविध प्रमुख आयटीएफ स्पर्धासाठी प्रवास व निवासाकरिता खर्चाची जबाबदारी, ३) सर्वोच्च दर्जा गाठण्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेण्याकरिता आवश्यक खर्च, ४) स्पर्धादरम्यान प्रशिक्षकाची उपस्थिती व मार्गदर्शनाचा लाभ, ५) सर्वोत्तम कामगिरीसाठी उच्च दर्जाची अत्याधुनिक साधने व अन्य सुविधा, ६) तंदुरुस्तीसाठी व दुखापतीतून सावरण्यासाठी क्रीडाविज्ञानाच्या साहाय्याने उच्च तंत्रज्ञानाचा समावेश असलेले प्रशिक्षण. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आज झालेल्या सामंजस्य करारावर लक्ष्यचे मानद सचिव आशिष देसाई आणि अमाल्गम स्टीलचे सौरव मिश्रा यांनी सह्या केल्या.
प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात १४ व १६ वर्षे वयोगटातील माया राजेश्वरन, प्रिशा शिंदे, काश्वी सुनील, ऐश्वर्या जाधव, रिशिता रेड्डी, नैनिका रेड्डी, याशिका शौकीन, सेजल भुतडा व आकृती सोनकुसरे या मुलींची निवड करण्यात आली असल्याचे सांगून सुंदर अय्यर म्हणाले, की येत्या काही महिन्यांत देशभरात विविध स्पर्धामध्ये या खेळाडू सहभागी होतील. त्यांच्यासह आम्ही प्रवासी प्रशिक्षक पाठविणार आहोत. ते या मुलींच्या कामगिरीचे मूल्यमापन करून आम्हाला अहवालदेतील आणि त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये आम्ही पहिल्या तुकडीसाठीची नावे निश्चित करू.
अय्यर पुढे म्हणाले, की या सर्व मुली येत्या काही दिवसांत पुणे, चंदिगढ, कोलकाता, नवी दिल्ली व इंदोर येथील ज्युनियर आयटीएफ स्पर्धामध्ये सहभागी होत असून त्यानंतर थायलंडमध्ये होणाऱ्या जे-२०० या आंतरराष्ट्रीय शिबिरासाठी पात्र ठरण्याकरिता आवश्यक गुणांची कमाई त्या करू शकतील असा आम्हाला विश्वास वाटतो. हा संपूर्ण प्रकल्प प्रख्यात प्रशिक्षक व लक्ष्यचे मेन्टॉर हेमंत बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली एस. नरेंद्रनाथ, शिविका बर्मन व नमिता बाळ या भारतीय प्रशिक्षकांच्या साहाय्याने पार पडणार आहे. हे सर्वजण आणि फिजिओ व तंदुरुस्ती विशेषज्ञ प्रशिक्षकही संपूर्ण दौऱ्यात खेळाडूंसोबत राहणार आहेत.
या प्रकल्पाच्या माध्यमातून लक्ष्य स्पोर्ट्स आणि अमाल्गम स्टील यांनी केवळ भारतीय टेनिसक्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी कंबर कसली आहे असे नव्हे, तर गुणवान खेळाडूंना संधी देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय टेनिसची मान उंचावण्यासाठी ते सिद्ध झाले आहेत. या प्रकल्पासाठी खेळाडूंच्या पोशाखाचे मुख्य प्रायोजक 'द इंडियन ट्री' यांचे आम्ही विशेष आभार मानत आहोत, असे लक्ष्यचे मानद सचिव आशिष देसाई यांनी नमूद केले.
'प्रोजेक्ट ग्रँड स्लॅम ' चा प्रारंभ कोल्हापूर येथे मे-२०२३ मध्ये झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धामधून करण्यात आला. या वेळी १४ व १६ वर्षांखालील गटातील १५० मुलींमधून पहिल्या टप्यासाठी खेळाडू निवडण्यात आले. खेळाडूंच्या सध्याच्या आणि मागील कामगिरीच्या आधारे १२ खेळाडूंची पहिल्या टप्प्यासाठी निवड झाली. या खेळाडूंना त्यानंतर क्रीडाविज्ञान तज्ज्ञ आणि प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली पुणे येथे झालेल्या कडक प्रशिक्षण सत्रातून जावे लागले. टेनिससाठी आवश्यक तंदरुस्ती आणि खेळाचे विविधांगी प्रदर्शन करण्याची क्षमता इत्यादी चाचण्यांमधूनही त्यांना जावे लागणार आहे. त्यामध्ये फोरहँड व बॅकहँड फटक्यांचा वेग, सर्व्हिसची भेदकता, फटक्यांची डावपेचात्मक निवड करण्याची क्षमता, मॅच टेम्परामेंट इत्यादी गुणांचा समावेश होता.