के.एल.राहुल कसोटी संघाबाहेर, जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन

धर्मशाला येथे भारत-इंग्लंडमधील अंतिम कसोटी सामना

KLRahul

के.एल.राहुल कसोटी संघाबाहेर, जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन

#धर्मशाला 

भारत व इंग्लंडमधील कसोटी मालिकेतील अंतिम पाचवा सामना धर्मशाला येथे ७ मार्चपासून सुरू होत असून संघाचा मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज के. एल. राहुल दुखापतीतून सावरून संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. राहुल दुखापतीतून अद्याप बरा झालेला नाही. त्यामुळे राहुल पाचव्या कसोटीला मुकणार आहे. दरम्यान, टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आली असून जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करणार आहे.

तसेच वॉशिंग्टन सुंदरदेखील पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा भाग नसेल. रणजी सामना खेळण्यासाठी सुंदरला टीम इंडियातून मुक्त केले होते. तमिळनाडूचा संघ रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुंबईशी भिडणार आहे. वॉशिंग्टन सुंदर या सामन्यात तमिळनाडूचं प्रतिनिधीत्व करेल. दरम्यान, सुंदरच्या जागी दुसऱ्या कोणत्याही खेळाडूची संघात निवड करण्यात आलेली नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका निवेदनात म्हटले आहे की, राहुल फिटनेस टेस्टमध्ये पास झाला असता तर त्याला संघात संधी दिली जाईल असं निवड समितीने आधी जाहीर केलं होतं. परंतु, राहुल दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याला या कसोटीत विश्रांती दिली आहे. बीसीसीआयचं वैद्यकीय पथक राहुलच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. अधिक चांगल्या उपचारांसाठी राहुलला लंडनला पाठवले आहे.

बुमराहला चौथ्या कसोटीपूर्वी संघातून मुक्त करण्यात आलं होतं. पाचव्या कसोटीसाठी तो उपलब्ध असणार आहे. त्यामुळे बुमराह धर्मशालाच्या मैदानावर खेळताना दिसेल. दुखापतग्रस्त मोहम्मद शमी अद्याप संघाबाहेर आहे. शमीवर लंडनमध्ये एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शमीला मैदानावर परतण्यास तीन ते चार महिने वाट पाहावी लागेल. दरम्यान खराब फॉर्ममध्ये असलेला रजत पाटिदार अद्याप संघात आहे. भारताचा संघ असा. 

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटिदार, सर्फराझ खान, के. एस. भरत, देवदत्त पडिक्कल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest