संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे रविवारी (दि. १) हाती घेतली. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची जागा घेत ३६ वर्षीय जय शाह आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत.
आयसीसीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. ‘‘जय शाह यांचा आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू झाल्याने जागतिक क्रिकेटचा नवा अध्याय सुरू झाला आहे. शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या वक्तव्यात म्हटले आहे की, क्रिकेटच्या विविध फॉरमॅटला प्रोत्साहन देणे आणि महिला क्रिकेटला अधिक गती देणे हे आमचे प्राधान्य आहे,’’ असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
शाह म्हणाले, आयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संचालक मंडळ आणि सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. जागतिक क्रिकेटमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि मी आयसीसी संघ आणि आयसीसीसोबत काम करण्यास उत्सुक आहे. प्रत्येक परिस्थितीत खेळाला नवीन उंचीवर नेण्यासाठी काम करणार आहे. आम्ही २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहोत आणि जगभरातील चाहत्यांसाठी क्रिकेटला अधिक आकर्षक बनवण्यासाठी आम्ही काम करत असताना ही एक रोमांचक वेळ आहे. आम्ही त्यांना खेळाशी जोडण्याचा प्रयत्न करू.
आयसीसीचे चेअरमन ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपला. २०२० पासून ते या पदावर होते. आयसीसीने २० ऑगस्ट रोजी कळवले होते की बार्कले तिसरी टर्म घेणार नाही. यानंतर नवीन अध्यक्षांसाठी अर्ज मागविण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्टरपर्यंत होती. मात्र, शाह यांच्याव्यतिरिक्त कोणीही या पदासाठी उमेदवारी दाखल केली नव्हती. अशा स्थितीत निवडणूक न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
जय शाह या वर्षी २२ सप्टेंबर रोजी ३६ वर्षांचे झाले. ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. त्यांच्या आधी नियुक्त झालेले सर्व १५ अध्यक्ष हे ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. २००६ मध्ये, दक्षिण आफ्रिकेचे पर्सी सन वयाच्या ५६ व्या वर्षी सर्वात तरुण अध्यक्ष झाले. जय शाह त्यांच्यापेक्षा तब्बल २० वर्षांनी लहान आहेत.
यंदा ऑगस्टमध्ये आयसीसी अध्यक्ष म्हणून घोषणा झाली तेव्हा जय शाह म्हणाले होते, ‘‘जागतिक स्तरावर क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी मी काम करत राहीन. सध्या क्रिकेटच्या अनेक फॉरमॅटला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. खेळात नवीन तंत्रज्ञान आणण्याचा मी प्रयत्न करेन. सोबतच मी विश्वचषकासारख्या कार्यक्रमांना जागतिक बाजारपेठेत नेणार आहे. २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश ही एक मोठी उपलब्धी आहे. आम्ही ऑलिम्पिकच्या माध्यमातून याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देऊ आणि ती अधिक देशांमध्ये नेण्याचा प्रयत्न करू.’’
आयसीसी प्रमुखपद भूषवणारे पाचवे भारतीय
आयसीसी प्रमुखपद भूषवणारे जय शाह हे पाचवे भारतीय आहेत. त्यांच्यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे आयसीसीचे प्रमुख राहिले आहेत. शाह हे आयसीसीचे १६ वे अध्यक्ष असतील. यापूर्वी न्यूझीलंडचे क्रिकेट प्रशासक ग्रेग बार्कले हे आयसीसी अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपला. ते २०१६ ते २०२० या काळात न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यादरम्यान किवी संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, अंतिम फेरीत इंग्लंडने त्यांना सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले.
अशी आहे जय शाह यांची वाटचाल...
जय शाह २००९ मध्ये सेंट्रल क्रिकेट बोर्ड अहमदाबादच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य बनले. सप्टेंबर २०१३ मध्ये ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव झाले. २०१५ मध्ये बीसीसीआयच्या वित्त समितीचे सदस्य झाले. २०१९ मध्ये प्रथमच बीसीसीआयचे सचिव बनले. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांची पुन्हा बीसीसीआयचे सचिव म्हणून निवड झाली.
शाह २०२१ मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष झाले. जानेवारी २०२४ मध्ये त्यांची पुन्हा एसीसी अध्यक्षपदी निवड झाली. २०२२ मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना ऑलिम्पिक खेळांसाठी आयसीसी ऑलिम्पिक वर्किंग ग्रुपचे सदस्यदेखील बनवले गेले. शाह यांची यंदा २७ ऑगस्ट रोजी आयसीसी प्रमुख म्हणून निवड झाली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.