भारत-पाक सामन्याचे तिकीट १.८६ कोटींवर!

टी-२० विश्वचषकात ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार सामना, भारताचे सर्व सामाने होणार अमेरिकेत

PuneMirror

भारत-पाक सामन्याचे तिकीट १.८६ कोटींवर!

#न्यूयॉर्क

यंदाची आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. यातील ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या एका तिकिटाची किंमत तब्बल १.८६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

अमेरिकन न्यूज वेबसाइट ‘यूएसए टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘स्टबहब’ आणि ‘सीटगीक’सारख्या वेबसाइट्सवर या वर्षीच्या टी-२० विश्वचषकाची तिकिटे आधीच लाइव्ह झाली आहेत. ‘स्टबहब’वरील सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत सध्या १,२५९ अमेरिकन डाॅलर्स म्हणजेच १.०४ लाख रुपये आहे. तर ‘सीटगीक’वर सर्वात महाग तिकिटाची किंमत १ लाख ७५  हजार डाॅलर आहे. यामध्ये ५० हजार डाॅलरची आवश्यक फी जोडून एकूण तिकिटाची किंमत २ लाख २५ हजार डाॅलर इतकी होते. भारतीय चलनात याची किंमत तब्बल १.८६ कोटी रुपये इतकी भरते.

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे संचालक फवाज बक्श म्हणाले, ‘‘आम्हाला आशा होती की वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स या दोन्ही देशांमध्ये तिकिटे विकली जातील, परंतु आम्हाला मिळालेला प्रतिसाद खरोखरच रोमांचक आहे. हे आमच्या अपेक्षेपलीकडे आहे. भारत-पाकिस्तान सामन्याला इतका जबरदस्त प्रतिसाद लाभेल, हे आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते.’’

टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत प्रत्येकी पाच संघांची विभागणी चार गटात करण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका हेही या गटात आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे सर्व सामने अमेरिकेतच खेळवले जाणार आहेत.

भारताचे पहिले तीन सामने न्यूयॉर्कमध्ये आणि चौथा सामना फ्लोरिडामध्ये होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध, दुसरा सामना ९ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध, तिसरा सामना १२ जून रोजी अमेरिकेविरुद्ध आणि चौथा सामना १५ जून रोजी कॅनडाविरुद्ध खेळणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यांसोबतच कॅनडा आणि भारत यांच्यात १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये होणाऱ्या सामन्याची तिकिटेही विकली गेली आहेत. फ्लोरिडामध्ये ते त्यांच्या मूळ किमतीच्या किमान दुप्पट किमतीत या सामन्याची तिकिटे विकली गेली.

यंदाचा आयसीसी टी-२० विश्वचषक १ ते २९ जूनदरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील ९ शहरांमध्ये खेळवले जातील. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत, या दोघांमधील ग्रुप स्टेजचा सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस शहरात २९ जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. 

टी-२० विश्वचषकात प्रथमच २० संघ

टी-२० विश्वचषक स्पर्धेत प्रथमच २० संघांचा समावेश करण्यात आला आहे, मागील दोन आवृत्त्यांमध्ये प्रत्येकी १६ संघ होते. इंग्लंड हा गतविजेता आहे, तर भारताने यापूर्वी २००७ मध्ये स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

स्पर्धेचा सलामीचा सामना कॅनडा आणि घरचा संघ अमेरिका यांच्यात होणार आहे. १ जून रोजी डॅलस येथे हा सामना होणार आहे. वेस्ट इंडिजचा पहिला सामना पापुआ न्यू गिनीविरुद्ध २ जून रोजी गयाना येथे होणार आहे. या स्पर्धेत २० संघांमध्ये २९ दिवसांत एकूण ५५ सामने खेळवले जातील. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एका स्पर्धेत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सामने होणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest