पहिले विजेतेपद पुणेरी पलटणच्या आवाक्यात?

प्रो कबड्डी लीग १०च्या अंतिम सामन्यात आज पुणेरी पलटणची हरियाणाशी लढत

PuneriPaltan

पहिले विजेतेपद पुणेरी पलटणच्या आवाक्यात?

#हैद्राबाद 

साखळी स्पर्धेत सर्वाधिक विजय, उपांत्य सामन्यातही दिमाखदार कामगिरी करणारा पुणेरी पलटणचा संघ प्रो कबड्डीच्या पहिल्या-वहिल्या विजेतेपदासाठी सज्ज झालाय. सर्व काही व्यवस्थित घडले  आणि केवळ ४० मिनिटे सर्वोत्तम खेळ केला तर पहिले विजेतेपद आम्ही खिशात टाकू असा विश्वास पुण्याचा कर्णधार अस्लम इनामदारने व्यक्त केला. प्रो कबड्डी लीग १० चा अंतिम सामना उद्या, जी.एम.सी. बालयोगी स्टेडियमवर होत आहे. अंतिम सामन्यात पुणेरी पलटणची हरियाणाच्या संघाशी लढत होणार आहे. 

गतस्पर्धेतही पुण्याने अंतिम फेरी गाठली होती. जखमी असल्यामुळे अस्लम अंतिम सामन्यात खेळू शकला नव्हता. त्यामुळे पुण्याचे विजेतेपदाचे स्वप्न जयपूरविरुद्धच्या निसटत्या पराभवामुळे पूर्ण झाले नव्हते. यंदा अस्लम आणि त्याची पुणेरी सेना पूर्ण फॉर्मातही आहे. त्यामुळे विजेतेपदासाठी ते प्रबळ दावेदार समजले जात आहेत. चढाया आणि पकडींच्या खेळात पुण्याचा संघ समतोल आहे. स्वतः अस्लम, पंकज मोहिते आणि मोहित गोयल चढायांची बाजू सांभाळत आहेत तर पकडींमध्ये इराणचा मोहम्मद रेझा आणि अभिनेष नटराजन बचावात अभेद्य कामगिरी करत आहेत.

मी बाद झालो तरी जास्त वेळ कोर्ट बाहेर राहात नाही. त्याचे कारण म्हणजे कोर्टवरील इतर सहकारी गुण मिळवून मला जीवदान देतात, असे अस्लमने सांगितले. उद्याही अस्लम कोर्टवर जेवढा जास्त काळ राहील तेवढी पुण्याच्या विजेतेपदाची शक्यता अधिक वाढणार आहे. प्रो कबड्डीत पुण्याचा संघ आता बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. त्याचे श्रेय खेळाडूंसह संघ व्यवस्थापनालाही आहे. आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला जसा पाठिंबा दिला, तसेच अंतिम सामन्यासाठीही आम्हाला शुभेच्छा द्या, असे आवाहन पुणेकरांना अस्लमने अंतिम सामन्याची तयारी करताना केले आहे.

या मोसमात पुणे आणि हरियाणा यांच्यात झालेल्या दोन साखळी सामन्यांत १-१ अशी बरोबरी झालेली आहे. जो सामना आम्ही त्यांच्याविरुद्ध गमावला होता, त्यातील चुका सुधारण्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे. अर्थातच आमचा आत्मविश्वास प्रबळ असल्यामुळे आम्ही प्रत्येक संधीचा फायदा घेऊ, असे अस्लम म्हणाला.

जयदीप दहिया याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हरियाणाचाही संघ तेवढाच आत्मविश्वास बाळगून आहे. उपांत्य सामन्यात आम्ही गतविजेत्या जयपूरला हरवले आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावलेले आहे, असे जयदीपने सांगितले. हरियाणा संघात भारतीय कबड्डीतील कोणताही नावाजलेला चेहरा नाही. सर्व नवोदित खेळाडू कमाल कामगिरी करत आहे. अष्टपैलू खेळ ही आमची जमेची बाजू असल्याचे जयदीप म्हणतो. हरियाणा संघाची मदार चढायांमध्ये शिवम पाठारे, विनय यांच्यावर असणार आहे तर बचावात जयदीप, मोहित, नंदाल अस्लमच्या चढायांना कसे रोखतात, यावर सामन्याचा निकाल ठरणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest