संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ (Indian Cricket Team) आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार आहे. सामना जिंकण्यासाठी भारताने चार फिरकीपटू खेळवावे, असा सल्ला भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजनसिंगने (Harbhajan Singh) दिला आहे.
मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडसाठी फिरकीपटू टॉम हार्टली याने जबरदस्त गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी दिग्गज हरभजन सिंग याने भारतीय संघ व्यवस्थापनाला हा सल्ला दिला आहे. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली. याकडे संकट म्हणून न बघता भारतीय संघव्यवस्थापनाने संधी म्हणून बघावे आणि चार फिरकीपटू खेळवण्याचा प्रयोग करावा, असे भज्जीने सुचवले आहे.
हरभजनच्या मते भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात चार फिरकी गोलंदाज खेळवले पाहिजे. उभय संघांतील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन फिरकी गोलंदाजांना खेळवले होते. टॉम हार्टली याच्यासाठी हा कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाचा सामना होता. त्याने हैदराबादमध्ये दुसऱ्या डावात ७ बळी घेत भारतीय संघाची वाट लावली आणि इंग्लंडला अनपेक्षित विजय मिळवून दिला. दुसरीकडे भारतासाटी अक्षर पटेल(Akshar Patel), रविचंद्रन अश्विन (R Ashvin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी फिरकीच्या जोरावर इंग्लंडचा घाम काढला. मात्र, फलंदाजांनी नवख्या हार्टलीच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकल्याने पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊनही यजमानांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. (Cricket News)
भारतीय खेळपट्टी नेहमीप्रामाणे याही वेळी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर हरभजन आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला, “भारताने जो संघ निवडला आहे, ते पाहता मला आशा आहे की, विशाखापट्टणममध्ये टर्निंग ट्रॅक असेल. पहिल्या कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटीत देखील चेंडू वळला, तर पूर्ण शक्यता आहे की, भारतीय संघ चार फिरकी गोलंदाजांना खेळवेल. जसप्रीत बुमराह संघात एकटा वेगवान गोलंदाज असेल.”
दरम्यान, इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात २८ धावांनी विजय मिळवला होता. हैदराबादमध्ये उभय संघांतील हा पहिला सामना पार पडला. विजयासाठी शेवटच्या डावात भारताला २३१ धावा हव्या होत्या. पण प्रत्युत्तरात भारतीय संघ ६९.२ षटकांमद्ये २०२ धावांपर्यंत मजल मारू शकला. उभय संघांतील दुसरा कसोटी सामना येत्या शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणममध्ये सुरू होईल.
अश्विन, अक्षरच्या सोबतीला कोण?
या सामन्यात भारतीय संघव्यवस्थापनाने फिरकी गोलंदाजांनी संधी द्यायचे ठरवल्यास युवा खेळाडूंना सामील करावे लागणार आहे. जडेजाच्या जागी संभाव्य संघात समाविष्ट करण्यात आलेला सौरभकुमार हा डावखुरा फिरकी गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाजही आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या सौरभने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९० विकेट घेण्यासोबतच २,०६१ धावाही केल्या आहेत. सौरभ कुमारने (Saurabh Kumar) नुकत्याच इंग्लंड अ संघाविरुद्ध पहिल्या डावात ७७ धावा केल्या आणि सामन्यात ६ बळी घेतले. फिरकीची चौकडी खेळवण्याचा निर्णय झाल्यास अश्विन, अक्षर पटेल, सौरभकुमार या तिघांव्यतिरिक्त चौथा गोलंदाज कोण असेल, याबाबत उत्सुकता आहे. चौथा फिरकीपटू म्हणून वाॅशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते.