संग्रहित छायाचित्र
बंगळुरू: भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) आपल्या कार अपघाताबाबत प्रथमच उघडपणे बोलला असून अपघात झाला तेव्हा आता सगळे संपल्याचे आपल्याला वाटते होते, असे त्याने सांगितले. (Indian Cricket)
२६ वर्षीय ऋषभ पंत कार अपघाताची आठवण काढत म्हणाला, ‘‘त्या दिवशी मला वाटले की जगात माझा वेळ संपला आहे. अपघाताच्या वेळी मला कुठे दुखापत झाली होती ते माहित होते. हे अधिक गंभीर असू शकते, परंतु मी भाग्यवान ठरलो आणि यातून बचावलो.’’
एका वर्षापूर्वी ३० डिसेंबर २०२२ रोजी दिल्लीहून डेहराडूनला जात असताना ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला होता. आता तो बरा झाला आहे आणि आगामी आयपीएल मोसमापासून क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. ऋषभ गमतीने म्हणाला की, मी एसयूव्ही घेतली होती, पण अपघातानंतर तिची अवस्था सेडानसारखी झाली होती.
ऋषभ म्हणाला की, जेव्हापासून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून मी भविष्याचा विचार केला नाही, पण या दुखापतीनंतर मी भविष्याचा विचार करू लागलो. मी डॉक्टरांना विचारले की मला दुखापतीतून बरे होण्यासाठी किती वेळ लागेल. मी डॉक्टरांना म्हणालो की, वेगवेगळे लोक दहा गोष्टी सांगत आहेत आणि फक्त तुम्हीच मला स्पष्टपणे सांगू शकता. यावर डॉक्टरांनी सांगितले की १६ ते १८ महिने पूर्णपणे बरे होण्यास लागू शकतात. तेव्हा मी डॉक्टरांना सांगितले की तुम्ही देत असलेल्या वेळेतून मी सहा महिने कापून घेईन.
रजत-निशूमुळे मी जिवंत...
रजत आणि निशू कुमार यांच्यामुळे मी जिवंत आहे, असे ऋषभने आवर्जून नमूद केले. अपघातानंतर दोघांनी ऋषभला कारमधून बाहेर काढले होते. तो बाहेर येताच कार पूर्णपणे जळून खाक झाली. ऋषभ म्हणाला, ‘‘मी आयुष्यभर या दोन मुलांचा ऋणी राहीन. माझा उजवा गुडघा पूर्णपणे निखळला होता आणि १८० अंशांनी वळला होता. गुडघा परत जागी आणण्यासाठी मी जवळ उभ्या असलेल्या लोकांची मदत मागितली. मी वेदनेने ओरडत होतो आणि आता स्वत:ला भाग्यवान समजतो की अपघातात पाय गमावला नाही. हाडाशिवाय इतर कोणत्याही मज्जातंतूला इजा झाली असती, तर डाॅक्टरांनी माझा पाय शरीरापासून वेगळा केला असता.’’