बॅझबाॅलचा बनवला खुळखुळा !

यजमान भारताने पहिल्या कसोटीतील पराभवातून धडा घेत आखली व्यूहरचना, सपाट खेळपट्ट्या ठरल्या टर्निंग पाॅईंट

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Tue, 20 Feb 2024
  • 11:32 am
Baseballmadeloose!

बॅझबाॅलचा बनवला खुळखुळा !

राजकोट: ज्या तंत्राच्या जोरावर इंग्लंडने क्रिकेटविश्वात धुमाकूळ घातला, त्या बॅझबाॅलला भारतीय संघाने सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरवले आहे. नियोजनबद्ध व्यूहरचना आखल्यानंतर त्याची मैदानावर प्रभावी अंमलबजावणी करीत यजमान संघाने साहेबांच्या संघावर पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.

'भारतात बॅझबाॅल कुचकामी ठरेल...' भारतीय क्रिकेट तज्ज्ञांचे हे भाकीत टीम इंडियाने खरे ठरवत इंग्लिश संघाचे खच्चीकरण केले आहे. राजकोटमधील धावांच्या बाबतीत मिळवलेला भारताचा सर्वात मोठा कसोटी विजय याची साक्ष देतो. ही लढत भारतीय संघाने तब्बल ४३४ धावांच्या फरकाने जिंकली. क्रिकेटचे जन्मदाते असलेल्या इंग्लंडचा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील धावांच्या फरकाने दुसरा सर्वांत मोठा पराभव ठरला. पहिल्या कसोटीतील अनपेक्षित पराभवातून धडा घेत भारताने आखलेली व्यूहरचना आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे हे यश मिळवता आले. मागील सुमारे दोन वर्षांपासून इंग्लंडला क्रिकेटविश्वातील धोकादायक संघ बनवणाऱ्या बॅझबाॅलची हवा भारतीय खेळाडूंनी अशा नियोजनबद्ध रितीने काढली, त्याचा हा आढावा...

बॅझबॉल म्हणजे काय?

क्रिकेटच्या पुस्तकात बॅझबॉल तंत्राचा उल्लेख नाही. परंतु इंग्लंड कसोटी संघाच्या नवीन आक्रमणाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करण्यासाठी हे नाव देण्यात आले. बॅझबॉल हा शब्द बॅझ आणि बॉल या दोन शब्दांनी बनलेला आहे. 'बॅझ' हे इंग्लंडच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम याचे टोपणनाव आहे आणि 'बॉल' हा क्रिकेटमधील महत्त्वाचा एक घटक आहे. हे दोन शब्द एकत्र करून 'बॅझबॉल' हा शब्द तयार झाला.

मॅक्युलम हा न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आहे. अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून त्याने आपली कारकीर्द गाजवली. ओपनिंग करताना तो पहिल्यापासून शेवटच्या चेंडूपर्यंत फक्त मोठे फटके मारण्यावर लक्ष केंद्रित करत असे. निवृत्त झाल्यानंतर त्याची इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली. त्याने इंग्लिश क्रिकेट व्यवस्थापनाला विश्वासात घेऊन पुस्तकी फटके बाजूला ठेवून कसोटीत आक्रमक फलंदाजी आणि प्रत्येक सामना जिंकण्याच्या इराद्याने खेळण्याची संकल्पना मांडली. ही रणनीती इंग्लिश बोर्डाला पसंत पडली आणि ती इंग्लंड कसोटी संघाने स्वीकारली. या जोरावर इंग्लंड संघाने कसोटीतील आपली कामगिरी उंचावण्यात यश मिळवले.

इंग्लिश मिडल ऑर्डर केली उद्ध्वस्त

भारतीय खेळपट्ट्यांवर इंग्लंडची मधली फळी फ्लॉप ठरली. जो रूट, बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो या एक से बढकर एक फलंदाजांना त्यांच्या लौकिकानुसार योगदान देता आले नाही. तीन सामन्यांत जो रूटने ७७, जॉनी बेअरस्टोने १०२ धावा आणि बेन स्टोक्सने १९० धावा केल्या. बेन फॉक्सलाही केवळ १०९ धावा करता आल्या.

आजघडीला क्रिकेटविश्वातील ‘फॅब फोर’ फलंदाजांपैकी एक असलेल्या जो रूटला या मालिकेत बुमराहने तीन वेळा, रवींद्र जडेजाने दोन वेळा आणि रविचंद्रन अश्विनने एकदा बाद केले. करिअरमध्ये आतापर्यंत बुमराहने रूटला नऊ वेळा बाद केले आहे.  जडेजानेही रूटला सातव्यांदा पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. आतापर्यंत अश्विनने स्टोक्सला बाराव्यांदा बाद तसेच बुमराहने स्टोक्सला दोनदा बाद केले. बुमराह आणि जडेजाने बेअरस्टोला प्रत्येकी दोनदा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बेन फॉक्स दोनदा अक्षर पटेलचा बळी ठरला.

 सपाट खेळपट्टी तयार करून इंग्लिश फिरकी मारा केला निष्प्रभ

इंग्लंडने पहिला सामना २८ धावांनी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लिश फिरकीपटूंनी १८ विकेट घेतल्या. नवोदित टॉम हार्टलेने पहिल्या डावात २ तर दुसऱ्या डावात ७ अशा एकूण ९ विकेट घेतल्या.  

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लिश संघाचा फिरकी मारा बोथट करण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटीसाठी सपाट खेळपट्ट्या बनवल्या. फलंदाजीसाठी योग्य बनवलेल्या सपाट खेळपट्ट्यांवर इंग्लंडचे अननुभवी फिरकीपटू कुचकामी ठरले. ही मात्रा बरोबर लागू पडल्याने भारताने दुसरी कसोटी १०६ धावांनी, तर तिसरी कसोटी ४३४ धावांनी जिंकून मालिकेत आघाडी घेतली.

भारतीय गोलंदाजांच्या रिव्हर्स स्विंगने केली जादू

दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी रिव्हर्स स्विंगचा वापर केला. याचा फायदा दोघांनाही झाला. रिव्हर्स स्विंगच्या जोरावर बुमराह या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर तीन सामन्यांत १७ बळी आहेत. बुमराहने दुसऱ्या कसोटीत ९ विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला होता.  पहिल्या कसोटीतही त्याने शानदार मारा करीत ६ बळी घेतले होते. राजकोट कसोटीत सिराजनेही आपली जादू दाखवत ४ बळी टिपले.

स्वीप आणि रिव्हर्स स्वीप शॉट्सद्वारे फिरकीपटूंवर वर्चस्व

या मालिकेत भारतीय संघाने रजत पाटीदार, सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेल या युवा फलंदाजांना पदार्पणाची संधी दिली. तिघांनीही त्याचे सोने केले. त्यामुळे मधली फळी मजबूत झाली. नवी रन मशीन यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनीही आघाडीला शानदार फलंदाजी केली. या पाचही तरुणांनी स्वीप आणि रिव्हर्स स्वीप शॉट्स खेळले, ज्यामुळे इंग्लंडची गोलंदाजी कमकुवत झाली. या मालिकेतील ६ डावांमध्ये यशस्वीने १०९ च्या सरासरीने दोन द्विशतकाांसह ५४५ धावा फटकावल्या आहेत. गिलनेही एक शतक आणि एका अर्धशतकाच्या जोरावर २५२ धावा केल्या. सर्फराझने पदार्पणाच्या सामन्यात दोन अर्धशतकांच्या मदतीने १३० धावांचे उपयोगी योगदान दिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest