टॉमच्या सहा बळींमुळे ऑस्ट्रेलियाने पाकला गुंडाळले

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या युवा विश्वचषक (१९ वर्षाखालील) क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा डाव १७९ धावांतच गुंडाळला.

AustraliabyTom'ssixwicketsWrappedinPak

टॉमच्या सहा बळींमुळे ऑस्ट्रेलियाने पाकला गुंडाळले

वेगवान गोलंदाज टॉम स्ट्रेकरच्या अचूक आणि वेगवान माऱ्यामुळे ही कामगिरी ऑस्ट्रेलियाला करता आली. स्ट्रेकरने २४ धावांत ६ बळी घेतले. भारताने या अगोदरच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तानशी भारताला अंतिम फेरीत झुंज द्यावी लागणार आहे. 

भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेला नमवत अंतिम लढतीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शामल हुसैन आणि शाहझैब खान यांनी २५ धावांची सावध सुरुवात केली. टॉम स्ट्रेकरने ही जोडी फोडली. विल्डरने हुसैनला १७ धावांवर बाद केलं. काही मिनिटातच शाह झैब तंबूत परतला. कॅल्युम विल्डरने त्याला बाद केलं. तो जेमतेम ४ धावाच करू शकला. कर्णधार साद बेगकडून पाकिस्तानला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. स्ट्रेकरने त्यालाही स्वस्तात माघारी धाडले. त्याने केवळ ३ धावा केल्या. अहमद हसानही फार काळ टिकला नाही. बिअर्डमनने हारून अर्शदचा प्रतिकारही संपुष्टात आणला.

अराफत मिन्हास आणि अझान अवैस यांनी ६ व्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. अवैस बाद झाल्यानंतर मिन्हासने नावेद अहमद खानला हाताशी धरून ७ व्या विकेटसाठी ३१ धावा जोडल्या. कॅम्पबेलने मिन्हासला बाद करत पाकिस्तानच्या प्रगतीला खीळ घातली. मिन्हासने ५२ धावांची खेळी केली. अझान अवैसनेही ५२ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियातर्फे स्ट्रेकरने ६ विकेट्स पटकावत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडलं.

पाकिस्तानने २००४ आणि २००६ मध्ये या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. यंदाच्या स्पर्धेत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर १८१ धावांनी दमदार विजय मिळवला. पुढच्या लढतीत त्यांनी नेपाळला ५ विकेट्सनी नमवलं. न्यूझीलंडला १४० धावात गुंडाळत पाकिस्तानने १० विकेट्सनी दणदणीत विजय साकारला. आयर्लंडने दिलेलं १८२ च्या लक्ष्यासमोर खेळताना पाकिस्तानची दमछाक झाली होती. सुपर सिक्सच्या लढतीत पाकिस्तानने बांगलादेशवर ५ धावांनी निसटता विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाच्या नावावर या स्पर्धेची तीन जेतेपदं (१९९८, २००२, २०१०) आहेत. ऑस्ट्रेलियाने नामिबियाला हरवत विजयी सलामी दिली. दुसऱ्या लढतीत त्यांनी झिम्बाब्वेवर २२५ धावांनी प्रचंड फरकाने विजय मिळवला. पुढच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडला डकवर्थ लुईस पद्धतीने निकाल ठरलेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने ११० धावांनी विजय मिळवला. पावसामुळे ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज लढत होऊ शकली नाही.वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest