संग्रहित छायाचित्र
येत्या १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची नाराजी अद्याप कायम असल्याने हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार १४ जानेवारी नंतरच होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये मंत्रिमंडळ खाते वाटपावरून अद्यापदेखील चर्चाचर्वण सुरू आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा हिरवा कंदील दिलेला नाही. शिवसेनेमधील नेते संजय राठोड, तानाजी सावंत, उदय सामंत, संजय शिरसाठ आदी नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा की नाही यावरून खूप सार्या चर्चा सुरू आहेत आणि त्यावरच निर्णय होत नसल्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीकडून होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपकडून धक्कातंत्र वापरण्यात येणार आहे. अनेक जुन्या मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये सुधीर मुनगंट्टीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.
महायुतीमधील दुसरा प्रमुख घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गटात देखील अनेक दिग्गजांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर सोबत आलेल्या अनेक मोठ्या नेत्यांना मंत्रिमंडळामधून डच्चू देण्याची शक्यता आहे. भरत गोगावले, संजय राठोड, संजय शिरसाट, दीपक केसरकर यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. या ठिकाणी शिंदे गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रताप सरनाईक, राजेंद्र गावित यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंकडे अनेक नेत्यांकडून लॉबिंग सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातील मंत्र्यांची यादी अद्यापही फायनल नसल्याने हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेल्या असल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, हा मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाच विरोधकांच्या प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.