पुण्यात आम आदमी पार्टी रस्त्यावर
मणिपूरमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरमधील दोन महिलांना पुरुषांच्या जमावाने अत्याचार करुन विवस्त्र करत भरदिवसा रस्त्यावरुन धिंड काढल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरली आहे. भर पावसात पुण्यात आपकडून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मोदी हटावो देश बचाओ अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना आपच्या नेत्या शमीम पठाण म्हणाल्या की, “महाभारतातील द्रौपदी असो की मणिपूरमधील त्या दोन महिला, शतकं बदलली मात्र महिलांचे अस्तित्व बदलले का? सातत्याने तिच्यावर अन्याय, अत्याचार होतो. मला एक कळत नाही, तुमचे देशात सरकार आणि पोलीस यंत्रणा असताना आपल्याच देशातील एक राज्य गेल्या दोन महिन्यांपासून जळत आहे. जाळखंड होतायत, जाळपोळ होत आहे, २२५ असे गुन्हे तेथे झाले आहे. ३६५ लोकं मेली आहेत. सर्वाधिक अत्याचार महिला आणि लहान मुलांवर होत आहेत. हा तर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. असे कितीतरी व्हिडिओ आहेत. मात्र, दोन महिन्यानंतर शांत डोक्याने आपले पंतप्रधान बाहेर येतात आणि म्हणात मला खूप पिडा झाली आहे. दोन महिन्यांत तुम्हाला पिडा झाली नाही का?”, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
यावेळी अभिजित मोरे म्हणाले की, “मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून त्यांचे धिंडवडे काढण्यात आले, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले, हा धक्कादायक प्रकार पाहून भारतीयांच्या मनाला अपार पिडा झाली. ही एक दिवसापुर्वी नाही तर दोन महिन्यापुर्वी घडलेली घटना आहे. गेली दोन महिने सलग मणिपूर जळत आहे. मणिपूर जळत असताना मात्र या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि सत्तेत बसलेला सर्वात मोठा पक्ष मूग गिळून गप्प बसला आहे. मणिपूर आणि देशात भाजपचे सरकार आहे. आमचा प्रश्न असा आहे की, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजपट लावली जाणार आहे का?” असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.