संग्रहित छायाचित्र
2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीचं (BJP Shivsena Yuti) सरकार आलं. भाजपाला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. युतीकडे 161 जागांचं बहुमत होतं. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thakceray) यांची महत्वाकांक्षा जागी झाली आणि त्यांनी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल धाब्यावर बसवून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत संधान साधलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांच्या कार्यकाळात सरकार काही नीट चालले नाही. इतकच नाही तर त्यांना आपला पक्ष देखील सांभाळता आला नाही. शिवसेना फुटली. महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणारी स्थिरता त्यामुळे संपुष्टात आली.
आपल्या चुकीच्या निर्णयांची फळे उद्धव यांना आता भोगावी लागत आहेत. सरकार तसेच पक्षाचे नेतृत्व करण्यात अपयशी ठरलेल्या उद्धव ठाकरे यांनी परतीचे दोर कापून टाकले आहे. महाविकास आघाडीत (Mahvikas Aghadi) उद्धव ठाकरे यांना सन्मानाची वागणूक मिळताना दिसत नाहीये. महाविकास आघाडीच आता उद्धव ठाकरे यांची कमजोर बाजू असल्याचं दिसत आहे. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात विरोधकांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच घेरलं होतं. त्यांना सरकार चालवता येत नाही, संसदीय शिष्टाचाराबद्दल ते अनभिज्ञ आहेत, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ते अवघे काही तास मुख्यमंत्री कार्यालयात गेले, विधीमंडळात विरोधकांच्या प्रश्नांना ते समर्पक उत्तरं देत नसत या मुद्यांवरून विरोधकांनी ठाकरे यांच्यावर चांगलीच टिका केली. विरोधकांच्या या टीकेत बऱ्याच प्रमाणात तथ्य होतं. यावरून उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाच्या उणिवा दिसून आल्या. आपले तब्बल 8 मंत्री आणि 40 आमदार त्यांच्या बाजूनं नाहीत हे त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत कळलं नाही. स्वत: शरद पवार यांनी आपल्या "लोक माझे सांगाती" या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्यावर मार्मिक भाष्य केलं. ते लिहितात की, "दोन वर्षात उद्धव ठाकरे काही तास मुख्यमंत्री कार्यालयात गेले. ही बाब आमच्या अनुभवी लोकांच्या पचनी पडणारी नव्हती".
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्वात कमकुवत कामगिरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची राहिली. काँग्रेस-राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मते मिळाली, परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांनी उद्धव ठाकरेंना नाकारल्याचं दिसलं. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काळजीत असल्यासारखे वाटतात. त्यांची मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळेच ते सतत दिल्लीवाऱ्या करत असल्याचं दिसत आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या दिल्लीतील कार्यालयाला भेटी देताना दिसत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर बसून देशाचे राजकारण चालवायचे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोब्बर उलट राजकारण करताना दिसत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. स्वत: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याची परंपरा नाही, असे थेट सांगून उद्धव यांच्या शिडातील हवाच काढून घेतली आहे. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार यांची देखील अशीच काहीशी भूमिका असल्याचं बघायला मिळालं.
महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाहीये. शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून आघाडीत उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध कुरघोड्या होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत सांगलीत विशाल पाटलांनी ठाकरेंच्या पक्षाच्या चंद्रहार पाटील यांना धूळ चारली. तर विधानपरिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी परस्पर आपले स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज भरला आणि नार्वेकर निवडून आले. मात्र झाल्या प्रकाराबद्दल शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंचं स्थान डळमळीत होताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंना अधिकाधिक कमजोर करून जास्तीत जाती जागा पदरात पडून घेण्याचा काँग्रेस आणि शरद पवार यांचा प्रयत्न आहे. त्या डावाला शरण जाण्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या समोर अन्य कोणताही पर्याय उरला नसल्याचं दिसत आहे.