नाराजांवर महामंडळांची मात्रा; आमदारकीचे स्वप्न पाहणारे भाजपमधील इच्छुक श्रीनाथ भिमाले, दिलीप कांबळे, राजेश पांडे यांची लावली वर्णी

विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध राजकीय पक्षांतून इच्छुक उमेदवारांनी आपआपल्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी करून उमेदवारीवर दावा केला होता.

BJP

नाराजांवर महामंडळांची मात्रा; आमदारकीचे स्वप्न पाहणारे भाजपमधील इच्छुक श्रीनाथ भिमाले, दिलीप कांबळे, राजेश पांडे यांची लावली वर्णी

विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध राजकीय पक्षांतून इच्छुक उमेदवारांनी आपआपल्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी करून उमेदवारीवर दावा केला होता. भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातून इच्छुकांची संख्या वाढली होती. मात्र त्यातील काहींची महामंडळावर वर्णी लावून ते नाराज होणार नाही, याची काळजी भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. पर्वतीतील श्रीनाथ भिमाले, पुणे कॅन्टोन्मेंटमधील दिलीप कांबळे आणि कोथरूडमधील राजेश पांडे यांची महामंडळावर वर्णी लावून नाराजांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

  शहरात पर्वती, पुणे कॅन्टोंन्मेट या दोन मतदारसंघातील विद्यमान आमदार सोडून इतर इच्छुकांनी उमेदवारीवर दावा केला होता. त्यामुळे भाजपमध्ये वादाची ठिणगी उडणार असल्याचे बोलले जात होते. परंतु राजकीय चाणक्यांनी टायमिंग साधत नाराजी टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली असून सध्यातरी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ या सलग तीन वेळा प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यामुळे दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही. आगामी निवडणुकीसाठी भाजपचे महापालिकेतील माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी पर्वतीमधून लढण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यात भिमाले हे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मित्र आणि निकटवर्तीय असल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मिसाळ या कसबा मतदारसंघातून निवडणुकीला सामोऱ्या जातील अशी चर्चाही झाली. मिसाळ यांनी आपण आपला मतदारसंघ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. उमेदवारांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजपने भिमाले यांची राज्य कंत्राटी कामगार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती आचारसंहितेपूर्वी केली. याच मतदारसंघाशेजारी असलेल्या कॅन्टोंन्मेट मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्यात येईल, असे सांगितले जाते. त्यामुळे विद्यमान आमदार असलेले सुनील कांबळे यांच्या ऐवजी त्यांचे बंधू माजी मंत्री दिलीप कांबळे हे उमेदवार असतील असे सांगितले जात होते. परंतु लोकसभा निवडणुकीचा विचार केला असता, या मतदारसंघात भाजपला फटका बसला होता, तर कॉंग्रेसला फायदा झाला होता. त्याचा विचार करून भाजपने जर उमेदवार बदलला तर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिलीप कांबळे यांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून सुनील कांबळे हेच उमेदवार असल्याचे आता स्पष्ट केले आहे. शहरात भाजपमध्ये सक्रिय असलेले प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांचीही राज्य वखार महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून ते नाराज होणार नाहीत याची काळजी भाजपने घेतली आहे.

शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर विविध महामंडळांवरील नियुक्त्या रखडल्या होत्या. मतदारसंघात नाराजीचा फटका बसू नये यासाठी राज्य शासनाने विधानसभा आचारसंहितेपूर्वी शेवटच्या क्षणी  रखडलेल्या महामंडळांच्या निवडी जाहीर केल्या. यामुळे इच्छुक उमेदवारांचे आमदारकीचे स्वप्न भंगल्याचे आता निश्चित होत आहे. सध्याच्या वातावरणावरून महायुतीला ही निवडणूक सोपी नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीतील पक्षांना अंतर्गत गटबाजी आणि नाराजी परवडणारी नाही. त्यामुळेच  चाणक्यांनी हा पॉवर गेम खेळला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story