दक्षिण सोलापूर मतदारसंघ: सुभाष देशमुखांच्या विरोधात वाढती नाराजी

भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची राज्यात महायुती आहे. राज्यात सर्वत्र या तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते मनापासून एकत्र आहेत. दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी हुकूमशाहीने कारभार केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 18 Oct 2024
  • 03:31 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महायुतीचा धर्म सोडून राजकीय भूकंप घडविण्याचा राष्ट्रवादी, शिवसेनेचा पवित्रा

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने उमेदवार बदलावा अन्यथा महायुतीचा धर्म मोडून राजकीय भूकंप घडविण्याचा पवित्रा महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आहे. भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात तीव्र नाराजी असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉ. बसवराज बगले, शिवसेनेचे आणप्पा सतुबर हे निवडणूक आखाड्यात उतरण्याच्या विचारात आहेत.

भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची राज्यात महायुती आहे. राज्यात सर्वत्र या तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते मनापासून एकत्र आहेत. दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी हुकूमशाहीने कारभार केला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कोणतेही नेते व कार्यकर्त्यांना देशमुख यांनी कधीच विश्वासात घेतले नाही. विकास कामांसाठी कोणतेही समन्वयाचे धोरण अवलंबले नाही. आमदारांनी महायुतीचा धर्म एकदाही पाळला नाही, अशा तक्रारी राष्ट्रवादी नेत्यांनी आपल्या पक्षनेतृत्वाकडे केल्या आहेत.

भाजपाने स्थानिक भूमिपुत्राला उमेदवारी दिल्यास महायुतीचा धर्म पाळून आम्ही काम करू.  आमदार सुभाष देशमुख यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यास कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत, असा निर्णय राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी घेतल्याचे वृत्त आहे.

दक्षिण सोलापूर मतदारसंघात लिंगायत आणि धनगर समाजाचे प्राबल्य असून राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस व सकल लिंगायत महासमितीचे राज्य समन्वयक डाॅ. बसवराज बगले आणि धनगर समाजाचे नेते, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आणप्पा सतुबर हे निवडणूक आखाड्यात उतरण्याच्या दृष्टीने गुप्त खलबते करीत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे बाबा मिस्त्री यांच्या प्रचाराचे सूत्रधार असलेले डाॅ.बसवराज बगले यांचा राजकीय अनुभव, कल्पक नियोजनामुळे भाजपाचे उमेदवार सुभाष देशमुख यांची दमछाक झाली होती. यंदा विधानसभा निवडणुकीत देशमुख यांना भाजपांतर्गत प्रचंड प्रमाणात विरोध वाढला आहे. त्यामुळेच स्थानिक भूमिपुत्र असलेल्या सर्वमान्य व्यक्तीला उमेदवारी दिली तरच महायुतीचा उमेदवार निवडून आणू, अन्यथा होण्याऱ्या नुकसानीची जबाबदारी भाजपाची असेल असा गर्भित इशाराही  राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी दिल्याचे समजते.

पिता-पुत्रांमुळे काँग्रेसला रान मोकळे - डॉ. बगले
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी महायुतीचे घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अजिबात विश्वासात घेतले नाही. त्यामुळे एकहाती प्रचार यंत्रणा राबविली. कसलाही समन्वय ठेवला नाही. मित्रपक्षांना बेदखल करून अपमानास्पद वागणूक दिली. लोकसभेचे उमेदवार रामभाऊ सातपुते पराभूत व्हावेत आणि काँग्रेसला रान मोकळे व्हावे अशीच यंत्रणा देशमुख पिता-पुत्रांनी राबविली. त्यामुळेच भाजपाचे मताधिक्य घटले, आता विधानसभा निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होईल, अशी गंभीर प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते डॉ. बसवराज बगले यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story