कसब्यात रासने तर पर्वतीत कदम; खडकवासल्यासह तीनही मतदारसंघात जुनाच सामना नव्याने

पुणे : भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शप) या पक्षांनी आपापल्या विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील उमेदवारांचादेखील समावेश आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 27 Oct 2024
  • 03:40 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शप) या पक्षांनी आपापल्या विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील उमेदवारांचादेखील समावेश आहे. भाजपाने कसबा पेठेमधून हेमंत रासने, खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर राष्ट्रवादीने (शरद पवार) खडकवासला मतदारसंघामधून पुन्हा सचिन दोडके, पर्वतीमधून अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या तीनही ठिकाणी जुन्याच प्रतिस्पर्धी उमेदवारांशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 भारतीय जनता पक्षाने यापूर्वी पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना तिकीट जाहीर केले होते. त्यांच्याविरुद्ध यंदा कोण लढणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू होती. मिसाळ यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अश्विनी कदम यांनी २०१९ साली लढत दिलेली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार मिसाळ यांना माधुरी मिसाळ ९७, हजार १२ मते मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी ५५.८२ टक्के होती. तर, अश्विनी कदम यांना ६० हजार २४५ मते मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी ३४.६७ टक्के एवढी होती. २०१९ साली पर्वतीमध्ये ५०.०३ टक्के मतदान झाले होते. कदम यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवीत पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामुळे, यंदा देखील पुन्हा मिसाळ आणि कदम यांच्यामध्ये लढत होणार आहे. मिसाळ या सलग तीन वेळा आमदार आहेत. त्यांची विधानसभेची ही चौथी निवडणूक आहे, तर अश्विनी कदम यांनी नगरसेविका म्हणून कामाची छाप निर्माण केली. त्यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षा म्हणून देखील चांगले काम केले होते.

तर, खडकवासला मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भाजपाचे आमदार भीमराव तापकीर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे ( शरद पवार  ) सचिन दोडके हे लढणार आहेत. विशेष म्हणजे तापकीर आणि दोडके यांची दोन्ही पक्षाने एकाच दिवशी उमेदवारी जाहीर केली. सन २०१९ साली झालेल्या निवडणुकीत तापकीर यांनी दोडके यांचा पराभव करीत निसटता विजय मिळवला होता. खडकवासला मतदारसंघात भाजपाने विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. वरकरणी ही लढत सरळ दिसत असली, तरी ही लढत यंदा लक्षवेधी ठरणार आहे. हा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर या भागात प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले. सन २००९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार रमेश वांजळे यांनी विजय मिळविला. त्यानंतर त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने तत्कालीन नगरसेवक भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर सन २०१४ आणि २०१९ साली देखील तापकीर हे विजयी झाले होते. मात्र, २०१९ साली त्यांना दोडके यांनी जोरदार लढत देत नाकीनऊ आणले होते.

तर, कसबा मतदारसंघात कॉंग्रेसने यापूर्वीच विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी घोषित केलेली आहे. भाजपाकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे हे देखील इच्छुक होते. मात्र, पक्षाने पुन्हा एकदा रासने यांना उमेदवारी दिली आहे. माजी महापौर आणि तत्कालीन आमदार मुक्ता टिळक यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत कॉंग्रेसने तत्कालीन नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने रासने यांना उमेदवारी दिली होती. कसब्याची जागा राखण्यासाठी भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी ताकद लावली होती. मात्र, या पोटनिवडणुकीत रासने यांचा धंगेकर यांनी पराभव केला होता. यंदा उमेदवार बदलला जाईल अशी अटकळ भाजपाचे कार्यकर्ते बांधत होते. मात्र, पक्षाने रासने यांनाच पुन्हा उमेदवारी बहाल केली आहे.

Share this story

Latest