संग्रहित छायाचित्र
नागपूर: सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेले भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज असलेले उदयनराजे यांनी सोमवारी नागपुरात शिवजयंती साजरी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले की, निवडणूक लढवावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. (Loksabha Election 2024)
उदयनराजे भोसले यांनी २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर साताऱ्याची लोकसभा निवडणूक जिंकली होती. निकालानंतर काही दिवसांनी त्यांनी खासदारकीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला. त्यानंतर भाजपाने उदयनराजे यांना राज्यसभेवर पाठवलं.
श्रीनिवास पाटील यंदा पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेची जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. महायुतीत ही जागा कोणाला मिळणार हे अद्याप निश्चित नाही. महायुतीत या जागेसाठी भाजपा अग्रही आहे. भाजपा पुन्हा उदयनराजेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादीचा अजित पवार गटही या जागेची मागणी करू शकतो. यावर उदयनराजे म्हणाले, आपल्या देशात लोकशाही आहे आणि प्रत्येकाला या लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा, मतदान करण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. श्रीनिवास पाटील हे वयाने मोठे तर आहेतच. त्याचबरोबर ते वडीलधारे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना आव्हान देण्याचे वक्तव्य मी करणार नाही.
उदयनराजे म्हणाले की, माझी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे का असा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्हीच सर्वांनी सांगा की, तुमची काय इच्छा आहे. खरंतर निवडणूक लढवावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्याला मीही अपवाद नाही.”
तुम्ही भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढणार की वेळ पडल्यास ही जागा अजित पवार गटाला सोडणार, असा प्रश्नही भोसले यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. त्यांचे सर्व सहकारीही त्या दृष्टीने काम करतात. भाजपा सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये देशाचा आणि राज्याचा विकास केला आहे. आपण नागपूरचं उदाहरण पाहू शकता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरचा विकास केला आहे. केवळ नागपूर जिल्हाच नाही, तर भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात विकासकामे केली आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.