काँग्रेस-आप युतीमुळे दिल्लीचे राजकारण बदलणार?
नवी दिल्ली : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत राजधानी दिल्लीतील सातपैकी किमान एक जागा जिंकण्यात अपयश आलेले काँग्रेस, आम आदमी या दोन पक्षांनी यंदाच्या लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांतील जागावाटपावर नुकते शिक्कामोर्तब झाले असून त्यानुसार दिल्लीतील सातपैकी आम आदमी पक्ष चार, तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढणार आहे. यापूर्वी दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवून भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर एकत्रपणे आपण भाजपाला टक्कर देऊ शकतो का हे आता आजमावले जात आहे. (Lok Sabha 2024)
एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार आम आदमी पक्ष (Aam Adami Party) नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली अशा चार जागांवर निवडणूक लढेल, तर काँग्रेस उत्तर पूर्व दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली आणि चांदणी चौक या तीन जागांवर निवडणूक लढणार आहे. दोन्ही पक्षांनी ज्या प्रकारे जागांची निवड केली आहे, त्यासाठी उमेदवारांची जिंकण्याची क्षमता आणि सामाजिक समीकरण याशिवाय विविध घटकांचा विचार करण्यात आल्याचे दिसून येते.
याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षाचे मतदार हे जवळपास एकसारखेच आहेत. या संदर्भात आम आदमी पक्षाचे नेते म्हणाले, ‘गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता, त्याचा तोटा आम्हाला सहन करावा लागला. आम्हाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यावेळी आप आणि काँग्रेसची मतं विभागली गेली आणि त्याचा थेट फायदा भाजपाला झाला. मात्र, आता आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे यंदा आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील.’
सूत्रांच्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाने जागावाटपादरम्यान त्यांच्या सरकारने पाच वर्षात केलेली कामं, त्यांच्या आमदारांना मिळणारा पाठिंबा तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता या आधारावर जागांची मागणी केली. काँग्रेसने अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास मतदारांना डोळ्यासमोर ठेवत जागांची मागणी केली.
या संदर्भात आपचे नेते म्हणतात, सुरुवातीला काँग्रेसने २०१९ लोकसभा निवडणुकीतील प्रदर्शनानुसार आम्हाला दोन जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, आम्ही त्यांच्याकडे पाच वर्षात केलेली कामे, आमच्या आमदारांना मिळणारा पाठिंबा, आपने दिल्लीत स्थापन केलेली सत्ता आणि केजरीवाल यांची लोकप्रियता या आधारावर आणखी जागांची मागणी केली. त्यानुसार आम्ही चार आणि काँग्रेस तीन असे जागावाटप निश्चित केले.
आपने काँग्रेसबरोबर युती करत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काँग्रेसचा ज्या जागांवर दावा होता, त्यामुळे जागावाटप निश्चित होत नव्हते. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपने काँग्रेसला उत्तर पूर्व दिल्ली, पूर्व दिल्ली आणि चांदणी चौक अशा तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नव्हता. या संदर्भात काँग्रेसचे नेते म्हणतात, ‘आपने दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नव्हता, कारण आपने ज्या तीन जागांचा प्रस्ताव आम्हाला दिला होता, त्यापैकी उत्तर पूर्व दिल्ली, पूर्व दिल्ली हे उत्तर प्रदेशच्या शेजारी आहेत. त्यामुळे या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांचा प्रभाव आहे. अशावेळी दोन्ही जागांवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करणे अवघड गेले असते.’
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर भाजपाचा विजय झाला होता. या निवडणुकीत भाजपाला ५६ टक्क्यांच्या जवळपास मते मिळाली होती. काँग्रेसला २२ टक्के आणि आम आदमी पक्षाला १८ टक्क्यांपेक्षा थोडी जास्त मते मिळाली होती. दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या वेळी निवडणुकीपूर्वी घडलेले पुलवामा हत्याकांड आणि त्याला भारताने दिलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या प्रत्युत्तराने निवडणुकीच्या काळातच देशप्रेमाची लाट आली होती आणि त्याचा फायदा भाजपाला झाला होता, हे येथे विसरून चालणार नाही. काँग्रेस नेते म्हणतात, आमच्याकडे भाजपाला चांदणी चौक, ईशान्य दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली या जागांवर कडवी टक्कर देण्याची क्षमता आहे. या जागांवर आम्ही भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या कोणत्याही नेत्याला उमेदवारी देऊ शकतो. या दोन पक्षांनी केलेल्या युतीमुळे भाजपाला किती आव्हान मिळते हे आता लवकर स्पष्ट होईल.
आपचे नेते म्हणतात, नवी दिल्ली हा स्वत: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आम्ही भाजपासाठी मोठं आव्हान उभं करू शकतो. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी राहतात, हे कर्मचारी जुन्या पेंशनच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजपा सरकारवर नाराज आहे. याशिवाय इतर तीन मतदारसंघातही आम्हाला स्थानिकांचा प्रचंड पाठिंबा आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे. तसेच मनीष सिसोदिया यांच्या विरोधातील कारवाईमुळे जनतेमध्ये नाराजी आहे, त्यामुळे यंदा दिल्लीत भाजपासाठी आव्हानात्मक परिस्थिती असेल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.