संग्रहित छायाचित्र
परभणी: लोकसभा निवडणुकीची (Parbhani Lok Sabha Election) आता सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. भाजपच्या वतीने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार संजय जाधव यांची उमेदवारी फायनल आहे, पण खरी तिकिटाची रस्सीखेच सुरू आहे महायुतीमध्ये. महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर हे मागील बऱ्याच दिवसांपासून लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराला त्यांनी सुरुवातही केली आहे. त्याचबरोबर भाजपकडून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे देखील कामाला लागले आहेत. शिवसेनेकडूनही या लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकण्यात आलेला आहे. पण, प्रत्यक्षात कामाला मात्र कोणी सुरुवात केलेली नाही.
परभणी लोकसभा मतदारसंघ हा पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण या वेळेस शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्हीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. त्यामुळे या परभणी लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेनेदेखील दावा ठोकला आहे. उमेदवारीसंदर्भात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अन्य एक दोन नावांची चर्चादेखील सुरू आहे. पण, प्रत्यक्षात मात्र शिवसेना प्रचाराच्या रिंगणात मात्र अद्यापही उतरलेली नसल्याचे दिसून येत आहे.
तर, दुसरीकडे महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र निवडणुकीची जोरदार तयारी करत आहे. राष्ट्रवादीकडून परभणी लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत थोड्या फरकाने पराभव पत्करल्यानंतर या वेळेस मात्र त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. मागील महिनाभरात त्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात मानवत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामांच्या उद्घाटनासोबत प्रचार सभाही घेतल्या. मागील काही दिवसांपूर्वी परभणी येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत युवकांचा मेळावा देखील झाला. वेगवेगळ्या समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील करण्यात येत आहेत. त्यामुळे राजेश विटेकर हे चांगलेच कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
भाजपकडून परभणी लोकसभा मतदारसंघात डझनभर उमेदवार इच्छुक आहेत. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर, डॉक्टर केदार कटिंग, आनंद भरोसे यांच्यासह बरेच जण इच्छुक आहेत, पण प्रत्यक्षात मात्र माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी चांगलेच कामाला लागले आहे. मागील दोन महिन्यांपासून ते लोकसभा मतदारसंघातील तालुकानिहाय भेटी देत आहेत. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर पक्षाकडे उमेदवारीदेखील तेवढ्याच ठामपणे मागत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.