रणसंग्राम २०२४: लोकसभा निवडणुकीत भाजपला जनता धडा शिकवणार : रोहित पवार

पुणे: बारामती, अहमदनगर, शिरूरसह अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. महाराष्ट्राची एक वेगळे राज्य म्हणून ओळख असून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपला धडा शिकवणार आहे, असे मत आमदार रोहित पवार

Rohit Pawar

संग्रहित छायाचित्र

राज्यात दहा जागांवर निवडणूक लढविणार, ‘मविआ’ ला अनुकूल वातावरण

पुणे: बारामती, अहमदनगर, शिरूरसह अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. महाराष्ट्राची एक वेगळे राज्य म्हणून ओळख असून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपला (BJP) धडा शिकवणार आहे, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. तसेच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) दहा जागांवर निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आमदार पवार (Rohit Pawar) यांचे पिंपरी-चिंचवड शहरातील दौ-यांचे प्रमाण वाढले आहे. पवार यांनी बुधवारी चिंचवडमधील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर  पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले, महाविकास आघाडी एकजुटीने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. लवकरच जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल. आमचा पक्ष दहा जागांवर निवडणूक लढविण्याची भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.

पक्षातील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची निवडणूक काटे की टक्कर होईल असे दिसत होते. मात्र, विरोधकांकडून उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आल्यानंतर सुळे यांच्याबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यांना पोषक वातावरण असून खडकवासला विधानसभा मतदारसंघात भरघोस मते मिळतील.

महायुतीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला केवळ चार जागा मिळतील. महायुती लोकसभा निवडणूक एकत्रित लढवेल. विधानसभा एकत्रित लढू शकणार नसल्याचे सांगत आमदार पवार पुढे म्हणाले, अजित पवारांना विधानसभेसाठी केवळ २० ते २२ जागा मिळतील. उर्वरित आमदारांना कमळाच्या चिन्हावर लढायला लावतील. विधानसभेला अजित पवारांसह सात ते आठ आमदार निवडून येतील. बारामतीत पवार यांचे विधानसभेचे मताधिक्य घटेल. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेकांसाठी विधानसभेची निवडणूक सोपी नसेल, असेही पवार म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर संघटनेत बदल होतील. त्यानंतरच मी जबाबदारी स्वीकारणार आहे. सद्या बूथ सक्षम करणे, पदाधिका-यांना मार्गदर्शन करण्याची माझ्याकडे जबाबदारी आहे.  

अजितदादांच्या भूमिकेला विरोध

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल कायम आदर राहील. मात्र, त्यांनी बदललेल्या भूमिकेला आपला विरोध आहे. व्यक्तिगत पातळीवर त्यांच्यावर आत्तापर्यंत कधी बोललो नाही आणि यापुढेही बोलणार नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest