संग्रहित छायाचित्र
भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan patil) यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटावर अत्यंत गंभीर आरोप करताना त्यांच्याकडून जिवाला धोका असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघानंतर इंदापुरातदेखील (Indapur Taluka) महायुतीमधील नेत्यांचा वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या पत्रात थेट राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचा उल्लेख केला नसला तरी ‘मित्रपक्ष’ असा सूचक उल्लेख करीत हे आरोप केले आहेत. ‘‘महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत,’’ असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
मित्रपक्षाकडून तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे मला माझ्या सुरक्षेची चिंता वाटत आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तत्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.
अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील वाद महाराष्ट्रातील जनतेला नवा नाही. पूर्वाश्रमीचे काॅंग्रेस नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचे पवार कुटुंबासोबत सख्य कधीच नव्हते. काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात असताना हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सहकारमंत्रिपद होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची कामे अपेक्षेनुसार केली नाही, असा आरोप करण्यात आला. दुसरीकडे, काॅंग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी असूनही प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले, असा आरोप अनेकदा हर्षवर्धन पाटील यांच्याकडून करण्यात आला. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले आणि आता राष्ट्रवादीत बंडखोरी करून अजित पवार सत्तेत सहभागी होत मुख्यमंत्री झाले. हे दोघे आतादेखील सत्तेत सहभागी असताना त्यांच्यातून विस्तव जात नाही. आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या दोघांमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. अलीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीने अजित पवार यांनी अनेकदा पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता.
लोकसभेच्या तोंडावर पुणे जिल्ह्यात महायुतीमध्ये वाद धगधगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटातील जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीनेसुद्धा काही दिवसांपूर्वीच अजित पवारांवर तोफ डागली होती. त्यामुळे हा वाद टोकाला गेल्याचे दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे.
शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील नेत्यांचा वाद गेल्या काही दिवसांपासून पेटलेला पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या दाव्यावरून प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक नेते दावा करू लागले आहेत. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांवरून महायुतीच्या घटकपक्षांमधील वाद मिटायची चिन्हे नसताना आता इंदापुरातही वाद टोकाला गेला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यात महायुतीमधील धुसफूस आणि जुन्या वादांचे पडसाद पाहायला मिळत आहेत.
पाटील यांचा रोख नेमका कुणाकडे?
हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या पत्रात मित्रपक्षाचा उल्लेख केला आहे, पण त्यांनी कोणत्याही नेत्याचं नाव नमूद केलेलं नाही. पण मित्रपक्ष म्हटल्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश होतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन पाटलांचा रोख इंदापूरचे अजित पवार सर्मथक आमदार दत्ता भरणे यांच्याकडे आहे. हर्षवर्धन पाटील १९९५ ते २०१४ या कालावधीत इंदापूरचे आमदार राहिले आहेत. आधी तीनदा अपक्ष आणि मग काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी बाजी मारली. या कालावधीत त्यांनी मंत्रिपदेही भूषवली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.