संग्रहित छायाचित्र
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याच्या बातम्या चर्चेत असून भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या तीन पक्षांमध्ये ३२-१२-४ असा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. या कथित फॉर्म्युलावर शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा १२ जागांचा कथित प्रस्ताव आम्हाला अजिबात मान्य नाही. शिवसेना (Shivsena) काय भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही. आम्ही तशी बांधू देणारही नसल्याचे सांगून कीर्तिकर म्हणाले की, फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच जागावाटपावर मित्रपक्षांमध्ये नेते काय चर्चा करत आहेत याची आम्हाला माहिती नाही. आमचे मुख्य नेते पक्षाची भूमिका ठरवताना आमच्याशी चर्चा करतीलच.
कीर्तिकर म्हणाले, भाजपाने जागा द्यायच्या आणि आम्ही त्या घ्यायच्या अशी आमची परिस्थिती नाही. भाजपाने १२ जागा दिल्या म्हणजे आमच्यावर उपकार केले का? भाजपाने या गोष्टी चर्चा करून ठरवाव्या. आमचे प्रमुख नेते (एकनाथ शिंदे) शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. आम्ही १८ जागांवर ठाम असायला हवं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे १३ खासदार आले आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी योग्य संरक्षण दिले पाहिजे. त्यांना राजकीय स्थैर्य मिळायला हवं. एकनाथ शिंदे कोणाला दगा देणार नाहीत. परंतु, आम्हाला १२ जागा मान्य नाहीत. मागच्या वेळी आमचे १८ खासदार आले होते. त्यामुळे आम्हाला किमान १८ जागा मिळायलाच हव्यात. हवं तर उरलेल्या जागा राष्ट्रवादीला देता येतील. आमच्याबरोबर दगाफटका व्हायला नको. शिवसेना काय भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही. आम्ही तशी बांधू देणारही नाही.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. यापैकी १८ जागांवर शिवसेनेचा उमेदवार जिंकला होता. शिवसेना फुटल्यानंतर १८ पैकी १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले. ५ खासदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. कीर्तिकर यांनी ३२-१२-४ या कथित फॉर्म्युलावर संताप व्यक्त केला. तुमच्या मनासारखं झालं नाही तर तुम्ही काय करणार? तुम्हाला अपेक्षित जागा न मिळाल्यास शिंदे गटाची भूमिका काय असणार? यावर कीर्तिकर म्हणाले, आम्ही काय करणार? तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं? आमच्याकडे प्लॅन बी वगैरे काही नाही. प्लॅन ए, प्लॅन बी वगैरे तुम्ही पत्रकारांनी तयार केले आहेत. १८ जागा लढवण्यावर आम्ही ठाम आहोत. शिवसेना पक्षाचा नेता म्हणून मी यावर ठाम आहे. आमचा प्रमुख नेता काय म्हणतो मला माहिती नाही. हे केवळ माझं मत आहे. शिवसेनेचा नेता म्हणून मी माझं मत व्यक्त केलं.
कीर्तिकर म्हणाले, हा जो फॉर्म्युला तयार केला आहे, त्याची काही अधिकृत घोषणा झालेली नाही. हे जे ३२-१२-४ आकडे पाहायला मिळत आहेत, याला काही आधार नाही. मुळात जागावाटपाची चर्चा कोण करतंय? त्याचा निर्णय कोण घेतंय? कुठल्या पक्षातील कोणते नेते, कोणती प्रमुख माणसं यावर काम करत आहेत? किंवा यासंबंधीचा निर्णय कोण घेत आहे? याबाबतची कुठल्याही प्रकारची माहिती आमच्याकडे नाही. मी शिवसेनेचा एक नेता आहे. महायुतीत शिवसेनेला लोकसभेच्या १२ जागा देण्याबाबत काही ठरलं असेल तर ते आम्हाला मान्य नाही. २०१९ च्या लोकसभेचा विचार करता आमचा २२ जागांवर दावा आहे. गेल्या निवडणुकीत भाजपा २६ जागांवर लढली होती. त्यांचे तीन उमेदवार पराभूत झाले आणि त्यांनी २३ जागा जिंकल्या. आम्हाला २२ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी आमचे चार उमेदवार पडले आणि आम्ही १८ जागा जिंकल्या. तसेच राज्यात विरोधी पक्षांचे सात उमेदवार जिंकले.
कीर्तिकर म्हणाले, मध्यंतरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि मविआ सरकार गडगडलं. त्यानंतर भाजपा शिवसेनेची युती होऊन राज्यात आमचं सरकार आलं. सरकार आणि राज्यात आमचं मोठं अस्तित्व आहे. राज्यातील शिवसेनेची ताकद आणि एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहता २०१९ प्रमाणेच जागावाटप व्हायला हवं. परंतु, आता आमच्या सरकारमध्ये नवीन सहकारी आले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला भाजपा, शिवसेनेने आपल्याकडच्या काही जागा द्यायला हव्यात.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.